म. टा. प्रतिनिधी, पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. त्यापाठोपाठ आता लगेचच शहर आणि जिल्हास्तरावरील पक्ष संघटनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश कार्यकारिणीतील प्रमुख नेत्यांना जिल्हानिहाय दौरा करण्याचे आदेश देण्यात आले असून, स्थानिक नेत्यांशी चर्चा करून संभाव्य शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांच्या नावांचा अहवाल सादर करण्याविषयी बजावण्यात आले आहेत. १५मेपर्यंत राज्यातील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे.पुण्याच्या शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींनाही वेग येऊ लागला आहे. शहरातील बहुसंख्य नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या थेट संपर्कात आहेत. त्यामुळे येथील शहराध्यक्षपदाचा निर्णय फडणवीस, बानवकुळे; तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एकत्रित बैठकीत होण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष जगदीश मुळीक यांना बदलण्यात येणार की काही काळ त्यांच्यावरच जबाबदारी ठेवण्यात येणार, याबाबतही मतमतांतरे आहेत.

घाटे, बीडकर, शिरोळे, कुलकर्णी शर्यतीत

शहराध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार समजले जाणारे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रदेश सरचिटणीसपदी आणि राजेश पांडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर माजी सभागृह नेते धीरज घाटे, गणेश बीडकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाचाही शहराध्यक्षपदासाठी विचार होऊ शकतो, अशी भाजपच्या वर्तुळात चर्चा आहे.

आक्रमक चेहऱ्याच्या शोधात

कसबा विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसल्याने अध्यक्षपदी नेमकी कोणाची नियुक्ती होणार, हा सध्या चर्चेचा मुद्दा ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असतानाही भाजपला या ठिकाणी यश मिळवता आले नाही. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे या निवडणुकीसाठी पुण्यात ठाण मांडून होते. त्यामुळे शहर भाजपमधील विसंवादापासून अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा त्यांना थेट प्रत्यय आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी आक्रमक आणि सर्वसमावेशक चेहऱ्याची भाजपला आवश्यकता असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

BJP Maharashtra : नव्या कार्यकारिणीची आज घोषणा, बावनकुळे यांची बाराशेची जम्बो टीम तयार
पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची

पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपचे राज्यातील क्रमांक दोनचे नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे पुणे शहराध्यक्षपदाचा निर्णय घेताना पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here