सांगली: नैसर्गिक आपत्ती आणि लॉकडाउनमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे निष्कर्ष मानसतज्ज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहेत. पाच ते १५ वर्षे वयोगटातील ८५ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. याशिवाय आत्मविश्वास खालावणे, भूक कमी होणे, असुरक्षिततेची भावना बळावली आहे. या मुलांना मानसोपचार आणि मार्गदर्शनाची गरज असल्याने सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे, अशी माहिती सर्वेक्षण करणारे शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेचे मानसतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिली.

करोना संसर्गामुळे गेल्या साडेचार महिन्यांपासून सर्वांचेच दैनंदिन नियोजन कोलमडले आहे. याचा सर्वाधिक फटका लहान आणि किशोरवयीन मुलांना बसला. शाळेच्या स्वतंत्र भावविश्वात वाढणाऱ्या मुलांना सक्तीने घरात थांबावे लागले. मित्र-मैत्रिणी, अभ्यास, खेळ, शिक्षकांशी असलेले भावनिक नाते हरवले आहे. यामुळे मुलांच्या भावविश्वावर आघात झाला. याचा अभ्यास सांगली जिल्ह्यातील शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेने केला. सांगली जिल्ह्यात गेल्यावर्षी आलेला महापूर आणि काही महिन्यातच सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली. जिल्ह्यातील ९०८५ कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन मानसतज्ज्ञांनी मुलांशी संवाद साधला. या सर्वेक्षणातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

याबाबत माहिती देताना संस्थेचे प्रमुख मानसतज्ज्ञ कालिदास पाटील म्हणाले, ‘लॉकडाउनमुळे सुरू असलेल्या अनिश्चिततेचा मुलांच्या वर्तनावर विपरीत परिणाम झाला आह. सर्वेक्षणामध्ये चिकित्सालयीन, शालेय, बाल मानसशास्त्रीय अशा तज्ज्ञ व प्रशिक्षित २५ मानस तज्ज्ञांनी सहभाग घेतला. या तज्ज्ञांनी ९०८५ कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पालक व मुलांशी संवाद साधला. मुलांमध्ये अकारण भीती, वारंवार रडणे, कमी झोप, इतर मुलांमध्ये न मिसळणे, अंथरूण ओले करणे, अंगठा चोखणे, नखे खाणे, बोलताना अडखळणे, हात पाय थरथरणे, डोके व पोट दुःखी अशा अनेक भावनिक, मनोशारीरिक तक्रारींसह चिडचिडेपणा, अती चंचलता, अतीसंताप, एकाग्रतेचा अभाव व विस्मरणाच्या तक्रारी वाढल्याचे सर्वेक्षणात आढळले. तीव्र स्वरूपाच्या मानसिक, भावनिक, वर्तणूक, शैक्षणिक समस्या असणाऱ्या मुलांमधील विविध मानसिक आणि मनोसामाजिक लक्षणांचा शोध घेतला असता, ८५ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा, ५७ टक्के मुलांमध्ये राग व अतीसंताप, ५२ टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी, तर ५१ टक्के मुलांमध्ये अतीचंचलतेचे प्रमाण दिसले.’

वाचा:

मुलांमधील भावनिक वर्तणूक व मनोसामाजिक समस्यांचे योग्य वेळी शास्त्रीय निराकरण न झाल्यास त्यांच्या मानसिकतेसह शिक्षण, आरोग्य आणि समाज वर्तनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता महाराष्ट्रातील ज्येष्ठ मानसतज्ज्ञांनी वर्तवली आहे. लवकरच ‘शुश्रुषा’ संस्था याबाबतचा अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर करणार असून, भक्कम उपायांसाठी शास्त्रीय प्रकल्प हाती घेणार आहे. सध्या मुलं व पालकांना मानसिक आधार देण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने २४ तास मोफत हेल्पलाइन कार्यरत केल्याची माहिती पाटील यांनी दिली.

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष नकोच

मुलांच्या विकासात मानसिक आरोग्याला सर्वाधिक महत्त्व आहे. पालकांनी मुलांचे वर्तन आणि भावनिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये, असे मत या अहवालाच्या निमित्ताने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भास्कर भोळे यांनी व्यक्त केले. तसेच मानसतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे आणि डॉ, संदीप सिसोदे यांनीही लॉकडाउनमध्ये मुलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हंटले आहे. शुश्रुषा संस्थेचे निष्कर्ष गंभीर असून, यावर वेळीच उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here