उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने रानतळे परीसरात सभेचे नियोजन केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने सभा घेण्याची परवानगी नाकारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण उद्धव ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हानही दिलं होतं. अशातच आता उद्या रिफायनरी समर्थकांचा मोर्चाही राजापूर येथील जवाहर चौकातून निघणार आहे. याची माहिती निलेश राणे पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली आहे. या मोर्चात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राजापूर येथे शनिवारी रिफायनरी समर्थक आणि विरोधक हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे आणि रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे नऊ जण ताब्यात
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी विरोधी आंदोलनाने पुन्हा जोर धरला आहे. जिल्हा पोलीस प्रशासनानेही या आंदोलनातील एक नेते बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे आणि त्यांची पत्नी मानसी अमोल बोळे यांच्यासह एकूण ९ ग्रामस्थांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News