इंदूर:
भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यानच्या इंटरनॅशनल सामन्यांच्या मालिकेतला मंगळवारचा दुसरा सामना भारताने जिंकला. ७ गडी राखून टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आणि या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ते भारताने १७.३ षटकांतच पूर्ण केले. लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि कर्णधार विराट कोहली या चौघांनीही दमदार खेळी केली.

इंदुरच्या होळकर स्टेडिअममध्ये हा सामना सुरू होता. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या कुशल परेरा (३४), धनुष्का गुणतिलका (२०) आणि आविष्का फर्नांडो (२२) या फलंदाजांच्या जोरावर संघाने १४३ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. शार्दुल ठाकूरने तीन विकेट्स घेतल्या तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी एकेक विकेट मिळाली.

भारतासाठी लोकेश राहुलने ४५, श्रेयस अय्यरने ३४, शिखर धवनने ३२ आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद ३० धावा कुटल्या. कर्णधार विराट कोहलीने १८ व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर विजयी षटकार लगावला आणि सामन्यावर भारताचे नाव कोरले.

भारतीय संघाचे पहिले १०० रन १४.२ षटकातच पूर्ण झाले. भारताने तीन गडी गमावत लक्ष्य पूर्ण केले. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. आता हा दुसरा सामना जिंकत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे तिसरा आणि अखेरचा सामना अटीतटीचा होणार आहे. हा अंतिम सामना पुणे येथे १० जानेवारी रोजी होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here