मुंबई : राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये येण्याची चिन्हे नसताना शरद पवार यांनी कधी नव्हे ते शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या रूपाने राज्यात सत्ता आणली. शरद पवार अशाचप्रकारचे आताही भाजपसोबत सत्तेचे समीकरण जुळवतील आणि आपल्याला केंद्रीय तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्यातून अलगद वाचवतील, अशी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांच्या एका गटाला आशा होती.भाजपसोबत आता सत्तेत गेल्यास आपल्यामागच्या चौकश्यांचा फेरा संपेल, आपल्याला निवडून येण्यासाठी लागणारी सर्व रसद आपोआप मिळेल, असा युक्तिवाद काही आमदारांकडून; तसेच काही नेत्यांकडूनही पक्षाच्या बैठकीत मांडला जाऊ लागला होता. पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे ही आशा पल्लवीत झाली होती. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पवारांनी आता राजीनामा मागे घेण्याचे जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीतील आमदारांचा वेगळ्या विचाराचा एक गट नाराज झाल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. त्यामुळे आता यातून मार्ग कसा काढायचा, असा गहन प्रश्न या आमदारांसमोर उभा ठाकला आहे.

भाकरी थांबली आहे: शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या मंगळवारी अचानक केल्यानंतर पक्षात निर्माण झालेला हलकल्लोळ अखेर शुक्रवारी शमला. पक्षातील नेते, कार्यकर्ते यांचा आग्रह, आर्जवे याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी अध्यक्षपदाचा आपला राजीनामा शुक्रवारी मागे घेतला. ‘मी भाकरी फिरवायला निघालो होतो; पण भाकरी थांबली आहे,’ असे उद्गार काढत पवार यांनी आपला निर्णय भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीर केला.

गेल्या मंगळवारी पवार यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताना, पुढील अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी समितीची घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीत जोरदार घुसळण सुरू होती. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती पक्षातील सर्वच घटक करीत होते. त्या धर्तीवर शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादीच्या संबंधित समितीची बैठक झाली. त्यात पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर पवार यांनी संध्याकाळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले.

अजितदादांची दांडी पण जयंतरावांसाठी शरद पवारांनी प्रेस थांबवली, पाटलांची ‘ताकद’ दिसली!

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा कमालीचा आग्रह आणि समविचारी पक्षातील नेत्यांचे आवाहन लक्षात घेऊन पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत आहे,’ अशी घोषणा त्यांनी केली. ‘असंख्य कार्यकर्त्यांच्या भावनेचा मी अनादर करू शकत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी, माकपचे सीताराम येचुरी यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी संपर्क साधून सध्याच्या काळात कार्यरत राहण्याची गरज बोलून दाखवली होती. त्या सर्वांच्या भावनांचा आदर करून अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे,’ असे पवार म्हणाले.

‘गेल्या दोन मे रोजीच्या प्रकाशन समारंभात मी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी इच्छा होती. मात्र नेते, कार्यकर्ते यांच्या भावना तीव्र असल्याचे निदर्शनास आले. ‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून जनतेच्या भावनांचा अनादर होऊच शकत नाही. याच लोकभावनेपोटी मी राजीनामा मागे घेत आहे,’ अशी पुस्ती पवार यांनी जोडली.

‘मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी पक्ष संघटनेमध्ये जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक आहे. पक्षात संघटनात्मक बदल करणे, १० ते १५ वर्षे काम करणाऱ्यांना संधी देणे, नव्या पिढीवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर आपला भर असेल. शिवाय पक्षवाढीसाठी मी अधिक जोमाने काम करणार आहे,’ असे ते म्हणाले. ‘आता मी पुण्याला निघालो आहे. सोलापूर, सांगोला, पंढरपूर येथील कार्यक्रमांना हजर राहून कर्नाटकमधील निवडणुकांसाठी निपाणीला जाणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

‘तुमची अध्यक्षपदाची कारकीर्द संपल्यानंतर उत्तराधिकारी ठरविणार का,’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारता ते म्हणाले, की, ‘असा कोणी उत्तराधिकारी ठरवून होत नसतो. एखादी जागा मोकळी होत असेल, तर पक्षातील नेते एकत्र बसून निर्णय घेत असतात. एखादी व्यक्ती असा निर्णय ठरवत नसतो. पक्षात आता नवीन लोकांना संधी देणार आहे. काही पदाधिकारी हे गेली अनेक वर्षे त्याच पदावर कायम आहेत. त्यांनाही राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची इच्छा आहे,’ असे पवार म्हणाले.

AJIT PAWAR MISSING : ऐतिहासिक क्षणी सगळे नेते झाडून हजर, पण अजितदादांची दांडी, पवार म्हणाले….

पवार यांच्या पुस्तकातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या काही टीकात्मक निरीक्षणांबाबत पत्रकारांनी या वेळी विचारणा केली. त्यावर, ‘मी वाईट काही लिहिलेले नाही. फक्त ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा निर्णय तडकाफडकी घेतला ते पटले नव्हते. कारण आमचे आघाडीचे सरकार होते. इतका मोठा निर्णय घेत असताना उद्धव ठाकरे यांनी इतर पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घ्यायला हवे होते,’ असे पवार म्हणाले. ‘महाविकास आघाडीची एकजूट कायम असून, तिच्या भवितव्यावर या घडामोडींचा कोणताही परिणाम होणार नाही,’ असेही पवार म्हणाले.

‘राष्ट्रवादी’चे काही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्याविषयी विचारले असता पवार म्हणाले, ‘काही व्यक्तींची मते ही पक्की असतात. पृथ्वीराज चव्हाण हे त्यापैकी एक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच त्यांचे आमच्याबद्दल प्रतिकूल मत होते व आहे. त्यामुळे आम्ही त्यांची मते गांभीर्याने घेत नाही. जनता त्यांना किती गांभीर्याने घेते हे मला माहिती नाही,’ असा टोला पवार यांनी लगावला.

अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चा

‘मी माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात न घेता निवृत्तीची घोषणा केली होती, तो अंदाज चुकीचा ठरला. आपल्या राजीनाम्याची कल्पना केवळ अजित पवार यांनाच देण्यात आली होती,’ असे शरद पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अजित पवार हे अनुपस्थित आहेत याकडे लक्ष वेधता, ‘सर्वच नेत्यांनी पत्रकार परिषदेला उपस्थित असणे आवश्यक नसते,’ असे उत्तर पवार यांनी दिले.

मलाच काहीच माहिती नाही, अजित पवार सांगत राहिले, पण पवारांनी सगळं सांगून दादांनाच तोंडावर पाडलं

1 COMMENT

  1. Hi there! Someone in my Myspace group shared this
    website with us so I came to give it a look. I’m definitely loving the information.
    I’m bookmarking and will be tweeting this to my followers!
    Exceptional blog and excellent design.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here