याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना केली होती. या अनुषंगाने देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे आणि उपनिरीक्षक अमित पाटील व विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार केली.
३० एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबऱ्यामार्फत पोलीस रेकॉर्डवरील अजिम सलीम पठाण (वय ३८, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) याने परराज्यातून चोरीतील चारचाकी वाहने आणून ती साताऱ्यासह रायगड व सोलापूर जिल्ह्यात विक्री केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अजिम पठाणला ताब्यात घेण्याची सूचना केली.
पोलिसांच्या या पथकाने अजिम पठाण आणि कोल्हापूर येथील एकाच्या ठावठिकाण्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त केली. तसेच रहिमतपूरहून पठाणला ताब्यात घेतले. त्यानंतर सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक केली. चौकशीत त्याने परराज्यातून चोरीची ७ वाहने आणून सातारा, रायगड जिल्ह्यात विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद चोरीतील कार तसेच दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यात चोरी केलेल्या अशी एकूण १० चारचाकी वाहने जप्त केली. या गाड्यांची किंमत १ कोटी १५ लाख रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य वाहन चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
दरम्यान, २ मे रोजी पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना पोलीस रेकॉर्डवरीलच महेश रामचंद्र अवघडे व त्याच्या दोन साथीदारांनी भुईंज पोलीस ठाणे हद्दीत एकास मारहाण करुन त्यांची दुचाकी व खिशातील १ हजार ८३० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले होते. त्याबाबत भुईंज ठाण्यात गुन्हा नोंद होता. याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत महेश अवघडे व त्याच्या साथीदाराकडून विविध ठिकाणाहून चोरलेल्या ८ दुचाकी जप्त केल्या. या दुचाकींची किंमत ३ लाख २० हजार रुपये आहे.