औद्योगिक विकास महामंडळाकडून सुचविण्यात आलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्हयातील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास व पाहणी करून आता कंपनीकडून औद्योगिक विकास महामंडळाला कळविण्यात आल्यानंतर पुढील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. या सगळ्याला औद्योगिक विकास महामंडळातील उच्चपदस्थ सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. या कंपनीकडून ८० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची इच्छा कंपनीने व्यक्त केली होती. यासाठी ५ हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याचीही विनंती केली.
हजारो रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता
सध्या कोकणात विजयदुर्ग आणि जयगड बंदर (रत्नागिरी) रस्ते आणि रेल्वेने जोडण्याचा केंद्रीय दळणवळण विभागाचा प्रस्ताव आहे. याबाबतची घोषणा नितीन गडकरी यांनी पनवेल येथील कार्यक्रमात केली होती. त्यामुळे या कंपनीला कोकणातील किनारपट्टी भागात जागा देण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे या मोठ्या प्रकल्पासाठी अनुकूल आहेत. याबाबत जागानिश्चिती, उर्वरीत जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाइम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे कोकणात हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी आशा आहे.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News