रत्नागिरी : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला होत असलेल्या स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूत दाखल झाले. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला सोलगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला आणि नंतर पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘या प्रकल्पावरून सरकारने माघार घेतली नाही तरी लवकरच हे सरकार कोसळणार आहे. यांच्या खुर्चीचे पाय डळमळीत होत आहेत,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच मी मुख्यमंत्री असताना बारसूची जागा रिफायनरीसाठी का सुचवली होती, याबाबतही उद्धव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.’आता जे गद्दार सुपारी घेऊन फिरतायत त्यांनी मी मुख्यमंत्री असताना मला सांगितलं की, बारसू येथे हा प्रकल्प झाला तर त्याला विरोध होणार नाही. बरीचशी जमीन निर्मनुष्य आहे. तसंच पर्यावरणाचीही फारशी हानी होणार नाही. त्यानंतर मी या जागेबाबत केंद्राला पत्र लिहिलं. मात्र या प्रकल्पाबाबत माझा असा विचार होता की, मुख्यमंत्री असतानाच बारसूत येऊन या प्रकल्पाचं येथील स्थानिक जनतेला प्रेझेन्टेशन द्यायचं. आता दुर्दैवाने फक्त मी लिहिलेल्या पत्राचं भांडवल केलं जातं, मात्र जी पारदर्शकता हवी ती ठेवली जात नाही,’ असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray: मंत्री असताना एकनाथ शिंदेंना तीन जिल्ह्यांमध्येही कोणी ओळखत नव्हतं; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना राज्यात जे वेदांता फॉक्सकॉन आणि इतर जे चांगले प्रकल्प आणले होते, ते केंद्राने यांच्या नाकाखालून गुजरातला नेले, तेव्हा हे गप्प का बसले, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

दरम्यान, आज राजापूर बारसू दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंना प्रशासनाकडून केवळ ग्रामस्थांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या बारसू परिसरातील रानतळे येथे होणाऱ्या सभेला परवानगी नाकारण्यात आली असून, रिफायनरी समर्थकांच्या राजापूर येथील मोर्चालाही प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या एकूण आठ आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here