म. टा. प्रतिनिधी, पुणेः धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये १८.४२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण हे सुमारे ९८ टक्के भरले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास बुधवारी खडकवासला धरण हे सुमारे शंभर टक्के भरण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, सोमवारी सायंकाळपासून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. मात्र, दिवसभर तुरळक पाऊस होता.

टेमघर धरण परिसरात रात्रभर सुमारे ४० मिलिमीटर, तर दिवसा सुमारे तीन मिलिमीटर पाऊस पडला. वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रात रात्री प्रत्येकी २४ मिलिमीटर, तर दिवसा अनुक्रमे पाच आणि सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरण क्षेत्रात रात्रभर सुमारे १७ मिलिमीटर पाऊस पडला. मात्र, दिवसभर अवघा दोन मिलिमीटर पाऊस झाला. चारही धरणे ही सुमारे ६३ टक्के भरली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

टेमघर धरणात १.६४ टीएमसी, वरसगाव धरणामध्ये ७.४२ टीएमसी, पानशेत धरणामध्ये ७.४३ टीएमसी आणि खडकवासला धरणात १.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या दिवशी चारही धरणे ही शंभर टक्के भरली होती. या धरणांमध्ये २९.१५ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा १८.४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

पिंपरी चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण हे सुमारे ५२ टक्के भरले असून, ४.४५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील अन्य धरणांपैकी गुंजवणी धरण क्षेत्रात २४ मिलिमीटर, निरा देवघर धरण परिसरात ३२ मिलिमीटर, भाटघर धरण क्षेत्रात २२ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. गुंजवणी धरण सुमारे ८६ टक्के, नीरा देवघर धरण सुमारे ५६ टक्के, भाटघर धरण सुमारे ६९ टक्के भरले आहे. वीर धरण सुमारे ९४ टक्के, भामा आसखेड धरण हे सुमारे ५३ टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

उजनी धरण क्षेत्रात पाऊस

सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरण परिसरात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. या धरण क्षेत्रात सुमारे १४ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे या धरणामध्ये सुमारे १४.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण सुमारे २८ टक्के भरले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here