आज रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार असला तरी जेव्हा आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा तो मुंबईकडून नव्हे तर डेक्कन चार्जर्सकडून खेळायचा. २०११ मध्ये तो मुंबई इंडियन्स संघाकडे आला. आयपीएलच्या पहिल्या ३ हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळताना रोहितने २००९च्या हंगामात धमाकेदार विक्रम केला. एवढच नाही तर हा विक्रम त्याने अन्य कोणत्या नाही तर चक्क मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध केला होता.
२००९ ची आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. तेव्हा ३२व्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना रोहितने चक्क हॅटट्रिक घेतली होती. मुंबईच्या डावातील १६व्या षटकातील पाचव्या, सहाव्या आणि त्यानंतर १७व्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने विकेट घेतली. रोहितने अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि डुमिनी या तिघांना बाद केले होते.
या लढतीत डेक्कन संघाने प्रथम फलंदाजीकरत ६ बाद १४५ धावा केल्या होत्या. रोहितने फलंदाजीत ३६ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले होते. १५व्या षटकात जेव्हा कर्णधार अॅडम गिलख्रिस्टने रोहितच्या हातात चेंडू दिला तेव्हा मुंबईने ४ बाद १०० धावा केल्या होत्या. ऑफ स्पिन गोलंदाजी करणाऱ्या रोहितने पहिल्या ४ चेंडूत फक्त २ धावा दिल्या आणि त्यानंतर जे झाले त्याने इतिहास घडवला.
रोहितने आधी अभिषेक नायर त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर जगभरातील फलंदाजांना स्वत:च्या फिरकीवर नाचवणाऱ्या हरभजनला रोहितने माघारी पाठवले. १७व्या षटकात गिलख्रिस्टने पुन्हा एकदा रोहितच्या हातात चेंडू दिला आणि त्याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत हॅटट्रिक केली. इतक्यावर रोहित थांबला नाही. त्यानंतर त्याने सौरभ तिवारीला बाद करुन चौथी विकेट मिळवली. रोहितच्या या शानदार कामगिरीमुळे मुंबईचा १९ धावांनी पराभव झाला. हिटमॅनने २ ओव्हरमध्ये ६ धावा देत ४ विकेट मिळल्या.
रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने एका हंगामात ३००हून अधिक धावा केल्या आणि हॅटट्रिक देखील घेतली. २००९ साली रोहितने ३६५ धावा केल्या होत्या.
सचिन सहाव्या प्रयत्नात विश्वचषक जिंकला, गांगुली- द्रविड तर जिंकलेच नाहीत – रवी शास्त्री