यंदाच्या हंगामात सोयाबीनने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. किमान सात ते आठ हजार रुपये दर अपेक्षित असलेल्या सोयाबीनला अवघा पाच ते साडेपाच हजार दर मिळाला आहे. ज्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लगेच न विकता घरीच साठवून ठेवले आहे. आता खरीप हंगाम तोंडावर आलेला असतांना किमान ६० टक्के सोयाबीन शेतकऱ्यांच्या दरात पडून आहे. पण दरात सातत्याने घट होत चालली आहे.
आज मात्र वाशिमच्या बाजार समितीत सोयाबीनच्या दरात दिडशे ते दोनशे रुपयांची वाढ बघायला मिळाली. आज सोयाबीनला किमान ४४५० ते कमाल ५२०१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर, आवकही हजार क्विंटलने वाढून ४२०० क्विंटल झाली आहे. तर रिसोडच्या बाजारात सोयाबीनला किमान ४६५० ते कमाल ५१३५ रुपये दर मिळाला आहे. काल बुद्ध पौर्णिमे निमित्त बाजार समिती बंद होती. उद्या रविवार असल्याने पुन्हा बंद राहणार आहे. सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आजच्या दराप्रमाणे पुढेही दरवाढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सोयाबीनला पर्याय ठरतोय ज्यूट
वाशिम जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र, सातत्याने घटत चाललेले उत्पादन, वाढता खर्च व अत्यल्प दर यामुळे शेतकरी पर्यायी पिकाचा विचार करत आहेत. अशातच महाबीज ने वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्यूट बीजोत्पादन कार्यक्रम दिला आहे त्यानुसार किमान ३०० हेक्टरवर ज्यूटची लागवड होऊ शकते. ज्यूट ला सोयाबीनच्या तुलनेत निम्माच उत्पादन खर्च लागणार आहे. शिवाय महाबीज ८००० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी ज्यूट पिकासाठी मोठ्या प्रमाणात महाबीज कडे नोंदणी करत आहेत.