जालना : उन्हाळा सुरू झाला की लगबग चालू होते ती लोणचं बनवण्याची. एकेकाळी घरोघरी लोणची केली जायची. पण काळ बदलला नोकरी, शिक्षणासाठी गावातून कुटुंबं शहरात आली आणि घरी लोणचं बनवणं कमी झालं. शहरात तयार लोणची विकत घेतली जाऊ लागल्याने घरगुती चविष्ट लोणच्याची मागणी वाढली. ही बदलती परिस्थिती हेरून जालन्यातील महिलेने खान्देशी लोणचं बनवून विक्री करण्यास सुरुवात केली आणि त्यातून आर्थिक स्थैर्य देखील मिळवलं.
या महिलेचा हा प्रवास अनेक संकटांनी भरलेला होता पण परिस्थितीशी दोन हात करत जे सगळं कमावल ते खरोखर प्रेरणादायी आहे.

शारीरिक व्याधींवर मात करून मराठवाड्यात नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात खान्देशी लोणच्याची विक्री करून आर्थिक स्थैर्य मिळवणाऱ्या यशस्वी उद्योजिका जालन्याच्या किरण देशमुख.

किरण देशमुख मूळच्या चाळीसगावच्या. त्यांचं सासर भुसावळचं. २००० मध्ये त्यांचं लग्न झालं. सुखाचा संसार सुरू झाला. पती नोकरीच्या निमित्ताने जालना येथे रुजू झाल्याने हे कुटुंब जालन्यात राहायला आलं. २००२ मध्ये त्यांना मुलगी झाली. त्यानंतर मात्र किरण यांना अचानक किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला. औषधोपचार सुरू होते पण त्रास कमी व्हायला तयार नाही.

दोन ते तीन ऑपरेशन झाली पण हे दुखणं वाढत गेलं आणि अखेर २००६ मध्ये किरण यांची एक किडनी खराब झाल्याचं निदान झालं आणि किडनी काढावी लागली. हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. आजाराने हे त्रिकोणी कुटुंब आर्थिकरित्या खचून गेलं होतं. मात्र लहान मुलगी आणि आजारपण सांभाळत सांकिरण यांनी आपलं पाक कलेचं नैपुण्य विकसित केलं होतं. आपली एक किडनी काढली आता कसं होईल याचा विचार न करता त्यांनी संसाराचा गाडा चालू ठेवला.

तीन फूट उंची, पण कर्तृत्व उत्तुंग शिखराएवढं; तिने जिद्दीने उभारला व्यवसाय, पूजा घोडकेची प्रेरणादायी गोष्ट
या काळात कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येथे आयोजित विविध उपक्रमात त्यांनी भाग घेतला. विविध प्रकारच्या प्रशिक्षणाला हजर राहून आपल्याला स्वतःचा पायावर उभं कसं राहता येईल याचा विचारही सुरू होता. दरम्यान २०१५ मध्ये त्यांच्या पतीने देखील काही कारणास्तव आपली नोकरी सोडली आणि आर्थिक ओढाताण सुरू झाली.

शेती नाही, वडिलोपार्जित काही नाही, जे काही नोकरीतून कमावलं ते आजारपणात खर्ची झाल्याने या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य नव्हतं. पण याचवेळी किरण यांनी पतीला धीर दिला. घरगुती व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी खान्देशी मसाल्याचा व्यवसाय सुरू केला. किरण या मूळच्या खान्देशी वातावरणात वाढलेल्या त्यामुळे त्यांना खान्देशी मसाल्याची पूर्ण जाण होती. सासर भुसावळचं असल्याने आई आणि सासू दोघींकडून किरण यांना मसाल्याच्या रेसिपी मिळाल्या होत्या.

सुरुवातीला खान्देशी मसाला, नागली पापड, खरोड्या, बिबड्या, ज्वारीचे पापड बनवणं आणि विकण्याचं काम त्यांनी केलं. लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा त्यांच्या डोक्यात खान्देशी लोणच्याचा विचार आला आणि त्यांनी खान्देशी लोणचं बनवणं सुरू केलं, त्यासाठी आई आणि सासूबाईंनी शिकवलेली रेसिपी कामाला आली आणि किरण यांनी बनवलेलं लोणचं ग्राहकांच्या पसंतीस पडलं. खान्देशी लोणच्याची भुरळ जालना शहरातील नागरिकांसोबत आजू-बाजूच्या जिल्ह्यातील लोकांना देखील पडायला लागली.

आठवडी बाजार, बचत गटाचे स्टॉल, एक्स्पो अशा ठिकाणी किरण यांचे स्टॉल लागायला लागले. गावरान कैऱ्यांपासून बनवणाऱ्या या लोणच्याची विशिष्ट रेसिपी असून किरण ताई त्यात खडा मसाला, बडीशोप, हिंग आणि खान्देशी मासल्यांचा वापर करतात त्यामुळे आता केलेलं लोणचं वर्षभर खराब होत नाही आणि चवही टिकून रहाते. त्यामुळेच त्यांच्या लोणच्याला ग्राहक पसंती देतात.

त्यामुळे १ क्विंटल, २ क्विंटल, ३ क्विंटल कैरीचं लोणचं बघता बघता संपून जातं, पण ग्राहकांची मागणी संपतच नाही. २० ते ५० किलो कैरीचं लोणचं बनवता बनवता घरगुती मसाल्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय किरण त्यांचे पती अनिल आणि मुलीने वाढवला असून किरण यांची मुलगी देखील आईला लोणचं, पापड, वडे, बिबड्या बनवण्यात मदत करते.

व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या तसं किरण यांच्या पतीने एक दुकान सुरू करून तिथे हे सर्व प्रॉडक्ट एका छताखाली विकण्यासाठी ठेवल्याने चोखंदळ आणि खवय्यांसाठी चांगली सोय झाली आहे. आता लोणच्याचा सिझन सुरू झाला आहे. त्यामुळे किरण ताई आणि त्यांचं त्रिकोणी कुटुंब सध्या लोणचं बनवण्यात व्यस्त आहे. या कामाच्या गडबडीत किरण ताई आपल्याला एकच किडनी आहे, आपली दोन ते तीन ऑपरेशन झाली आहेत, याचा विचार न करता जीवापाड मेहनत करून खवैय्या ग्राहकांना हवं ते बनवून देण्यात मग्न आहेत.

घरखर्च भागवण्यासाठी सुरू केला मसाल्यांचा व्यवसाय, पुण्याच्या शेतकरी महिलेची यशोगाथा; संयुक्त राष्ट्र संघाने घेतली दखल
जालन्यातील बरीच मुले देशाबाहेर आहेत. त्यांनाही त्यांचं इथलं कुटुंब किरण ताईंनी बनवलेलं लोणचं पाठवतात. खान्देशी लोणच्याचा स्वाद मराठवाड्यात देण्यात किरण ताईंचा मोठा वाटा आहे. गेल्या वर्षी ३ क्विंटल कैरीचं लोणचं संपल्याने यावर्षी ४ ते ५ क्विंटल कैरीचं लोणचं बनवण्याचं त्यांचे टार्गेट आहे. ऑर्डर वाढू लागल्या तर किरणताई तीन ते चार बायका लावून ऑर्डर पूर्ण करून घेतात.

आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून इतर महिलांना रोजगार देण्यात त्यांना आनंद वाटतो. शारीरिक व्याधींवर मात करून त्यांनी स्वतःला या व्यवसायात झोकून देत आज त्यांची महिन्याची आर्थिक उलाढाल ८० ते ९० हजार, तर वार्षिक उलाढाल ९ ते १० लाखापर्यंत वाढली आहे. त्यातून त्यांनी आर्थिक स्थैर्य देखील मिळवलं आहे. आर्थिक परिस्थितीशी सामना करत तसंच आपल्या आजारावर मात करत त्यांनी राज्यात, मराठवाड्यात खान्देशी लोणच्याची चव पोहोचवली असून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here