म. टा. वृत्तसेवा, पालघर

करोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावे, आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, शक्यतो घरातील धातू, संगमरवरी आदी मूर्तींचे पूजन करावे, शाडूची मूर्ती असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजपणा नसावा; श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी चार फूट व घरगुतीसाठी दोन फुटांची असावी; आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनि प्रदूषणासंबंधातील नियमांचे व तरतुदींचे पालन करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे, गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास ते माघी गणेशोत्सव किंवा २०२१च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

या उत्सवासाठी वर्गणी अथवा देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिराती गर्दी आकर्षित करणाऱ्या नसाव्यात तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक, रक्तदान शिबिरांसारख्या उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इ. द्वारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गणेशोत्सवाचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, असे बजावण्यात आले असून गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाचे तसेच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी, प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत, विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील व इमारतींमधील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढू नये, असे बंधन घालण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here