शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास भारतनगर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. जवळच असलेल्या श्रीराम नगरात राहणारा सरफराज त्याच्या दोन मित्रांसोबत इन्स्टाग्राम रील शूट करण्यासाठी गेला होता. रेल्वे रुळांच्या अगदी शेजारुन सरफराज चालत येत होता. मागून भरधाव ट्रेन येत होती. ही ट्रेन आपल्या अगदी बाजूनं जाईल असा त्यांचा अंदाज होता. मात्र तो सपशेल चुकला. ट्रेननं सरफराजला धडक दिली. तो काही मीटर दूर जाऊन पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
पोलिसांनी व्हिडीओची सत्यता पडताळून घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सरफराजच्या मित्रांचा जबाब नोंदवला आहे. ‘एमएमटीएस ट्रेन्स उतर ट्रेन्सपेक्षा रुंद असतात. त्यामुळे ट्रेन आणि स्वत:मधील अंतर किती असावं याचा अंदाज सरफराजला घेता आला नसावा,’ अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
जवळच असलेल्या मशिदीत जाण्यासाठी सरफराज शुक्रवारी दुपारी घरातून निघाला होता, अस त्याचे वडील मोहम्मद सादिक यांनी सांगितलं. ‘सरफराज घरातून गेल्यानंतर दोन तासांनी त्याच्या वर्गमित्रांचा फोन आले. ट्रेनची धडक बसल्यानं सरफराज बेशुद्ध पडल्याची माहिती त्यांनी दिली,’ असा घटनाक्रम सादिक यांनी कथन केला. सादिक यांच्या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी सरफराजचा मृतदेह गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.