mumbai traffic police, मुंबईकरांनो, तुमच्याही चारचाकीला गडद काळ्या काचा आहेत? मग दंड भरायला तयार राहा – mumbai traffic police collected fine of 34 lakhs due to four wheeler black glass
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सफेद रंगाची आलिशान कार आणि त्याला काळ्या काचा लावून फिरण्याचा मोह वाहनचालकांना आवरत नाही. काळ्या काचांच्या वापरावर बंदी असूनही त्यांचा सर्रास वापर केला जात आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या चार महिन्यांत चार हजार ई-चलान जारी केले असून ३४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सर्वात जास्त ११ लाखांचा दंड एकट्या जानेवारी महिन्यात ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे २०२२मध्ये वर्षभरात वसूल केलेल्या दंडापेक्षा चार महिन्यांतील आकडा तिप्पट आहे.जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वाहनांना लावण्यात येणाऱ्या काळ्या काचा किंवा काचांवर काळी फिल्म लावण्यावर बंदी घातली. या आदेशानंतर २०१२पासून राज्यांमध्येही या नियम लागू करण्यात आला. त्यानंतर २०१३पासून राज्यभरात काळ्या फिल्म आणि काचा लावणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली. परिवहन विभागाच्या परवानगीने तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना काळ्या काचा वाहनांना लावण्याची मुभा आहे. अनेकदा समाजकंटकांकडून गैरकृत्य, गुन्हे करण्याचा काळ्या काचांचा गैरवापर होण्याचा धोका असल्याने काळ्या काचा वापरण्यावर बंदी घालण्यात आली. मुंबईत वाहतूक पोलिसांनी विनापरवानगी काळ्या काचांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. या वर्षात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी ४०२२ ई-चलान जारी करीत ३४ लाख ३१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०२२मध्ये पूर्ण वर्षभरात एकूण ११ हजार ४८३ ई-चलान जारी करून ११ लाख ८४ हजार ५०० रुपये इतका दंड ठोठावण्यात आला होता. या वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांत ठोठावण्यात आलेला दंड हा २०२२मधील एकूण दंडापेक्षा चारपट अधिक आहे.