उल्हासनगर येथील शांतीनगर भागात असलेल्या प्रवीण इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये एक लग्न होते. यावेळी नवरदेवाचे वऱ्हाड हॉटेलच्या पार्किंगमध्ये पोहोचले असता, नवरदेवाचे वऱ्हाड त्याच्या कारच्या समोर नाचत होते. इतक्यात लग्नात नाचणाऱ्या १२ वऱ्हाड्यांना नवरदेवाच्या कारने चिरडल्याची घटना घडली आहे.
या दुर्घटनेत १२ वऱ्हाडी जखमी झाले असून एका जणाची प्रकृती चिंताजनक आहे. या रुग्णाला मुंबई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले असून तीन जणांवर उल्हासनगर मधील मीरा एन एक्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच ८ जखमींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जखमींमध्ये बहुतांश महिला आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून कार चालकाला अटक केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झाली नसून, मध्यवर्ती पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.