कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तत्कालीन सातारा जिल्ह्यात काम करण्यास सुरुवात केली. सत्यशोधक विचारांनी प्रभावित झालेले कर्मवीर भाऊराव पाटील यांना महात्मा गांधी यांनी रचनात्मक काम करण्याची सूचना केली होती. यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यातील कराडमधील काले गावात सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेनंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. वसतिगृहांची स्थापना, शाळा हायस्कूल उभारणी, महाविद्यालयाची स्थापना याद्वारे शिक्षणाची गंगा गरिबांच्या दारी नेण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं ९ मे १९५९ रोजी निधन झालं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दरवर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात उपस्थित राहतात. त्याप्रमाणं शरद पवार यांनी आज देखील कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन केलं. यावेळी शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.
शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेमध्ये हजेरी लावतील. त्या कार्यक्रमानंतर ११ वाजता रयत शिक्षण संस्थेची वार्षिक मीटिंग पार पडणार आहे. त्याला देखील ते उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेतील कार्यक्रम संपल्यानंतर जकातवाडी येथील शिक्षण संस्थेमध्ये मीटिंग आणि सत्कार समारंभाला उपस्थिती लावतील. तर, अजित पवार देखील साताऱ्यात असून ते साताऱ्यातील कार्यक्रम संपल्यानंतर फलटणला जाणार आहेत.