केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात इंधनाचा मागणी ११.७ टक्क्यांनी कमी झाली आहे. इंधनाच खप हे अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे प्रतिबिंब दाखवत असते. मात्र गेल्या महिन्यात इंधन मागणी कमी झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन तेल कंपन्यांच्या ताब्यात देशातील ९० टक्के रिटेल विक्री केंद्रे आहेत. या तेल शुद्धीकरण कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुद्ध इंधनाच्या मागणीमध्ये डिझेलची मागणी दोन पंचमांश असते. ही मागणी जुलै महिन्यात १३ टक्क्यांनी कमी नोंदवली गेली. या महिन्यात ४.८५ टन डिझेलची विक्री झाली. गेल्यावर्षी जुलै महिन्यात ही मागणी २१ टक्के होती, असे इंडियन ऑइलचे म्हणणे आहे. शुद्ध इंधनाची किरकोळीतील मागणी सातत्याने घटत चालल्यामुळे तेल शुद्धीकरणाच्या प्रमाणावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे याचा थेट परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर आणि पर्यायाने आर्थिक ताळेबंदावरही होई लागला आहे.
दरम्यान पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोल ८०.४३ रुपये असून डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये आहे. तर डिझेल ७७.०४ रुपये प्रती लीटर आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४२ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times