या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम भानुदास वाहुळ (रा. संजय नगर गल्ली नंबर १७ मुकुंदवाडी) असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर विलास करचुंडे, वैशाली करचुंडे (रा.शिवशाही कॉलनी मुकुंदवाडी), महादेव भालेराव, अश्विनी भालेराव (रा.मुकुंदवाडी) असे आरोपींचे नाव आहेत. गौतम हा मिस्तरी काम करतो. तो कुटुंबीयांसोबत संजय नगर मुकुंदवाडी भागामध्ये राहतो.
दरम्यान, काल मंगळवारी गौतम आणि विलास यांच्यामध्ये बांधकामाचे सामान घेण्यावरून वाद झाला. ही बाब मयत गौतमच्या मोठ्या भावाला कळली. यावेळी गौतमच्या मोठ्या भावाने आरोपी विलास याला सांगितले की “रात्री आपण गौतमला बोलावून मी त्याला समजावून सांगितले”. मात्र, काही वेळाने विलासने गौतमला घरी जाऊन शिवीगाळ करायला सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झालं.
दरम्यान, गौतमला विलास, अश्विनी, महादेव, वैशाली या चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. यावेळी विलासने लोखंडी रॉडने गौतमच्या पोटात मारहाण करून गंभीर जखमी केलं. ही बाब गौतमच्या मेव्हण्यांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने दुसऱ्या खासगी दवाखान्यात हलवण्यात आले यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी गौतमचा भाऊ संजय भानुदास वाहुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मारहाणीमध्ये गौतमचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतात परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी घाटी रुग्णालयामध्ये धाव घेतली.