कर्नाटकातील २२४ मतदारसंघांसाठी आज एकाच दिवशी मतदान होत आहे. राज्यात ५ कोटी ३१ लाख ३३ हजार मतदार असून, त्यांच्यासाठी ५८,५४५ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. शनिवार, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण सामर्थ्यानिशी प्रचार केला. मतदानाच्या एक दिवस आधी मंगळवारी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेही हनुमानाच्या चरणी लीन झाले. मुख्यमंत्री बोम्मई आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांनी मंगळवारी हनुमान मंदिरांना भेट दिली. बोम्मई यांनी हुबळीतील विजयनगर येथील मंदिरात जाऊन भाविकांसोबत हनुमान चालिसाचा जयघोष केला. तर शिवकुमार यांनी बेंगळुरूच्या के. आर. मार्केट येथील मंदिरात पूजा केली. बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रस्तावावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही मंदिर भेट लक्षणीय ठरली. केंद्रीय मंत्री व भाजपच्या राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुख शोभा करंदलाजे यांनीही बेंगळुरूतील श्री प्रसन्ना वीरांजनेय या अन्य हनुमान मंदिरात कार्यकर्त्यांसह प्रार्थना केली. त्यामुळे विशेषत: बेंगळुरूमधील अनेक हनुमान मंदिरांमध्ये ‘बजरंगबली की जय’चा जयघोष घुमत होता.
‘प्रत्येकाचे स्वप्न हे माझेच स्वप्न’
‘कर्नाटकातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न हे माझेच स्वप्न आहे’, असे सांगत ‘राज्यात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर यावे’, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांसमोर व्यक्त केली. ‘गेल्या काही दिवसांपासून राज्यात मिळालेले प्रेम अतुलनीय आहे आणि यामुळे राज्याला सर्व क्षेत्रांमध्ये ‘नंबर वन’ करण्याचा निर्धार दृढ झाला आहे’, असेही ते म्हणाले. मोदी यांनी या निवडणुकीसाठी राज्यात १९ जाहीर सभा आणि सहा रोड शो केले.
‘कन्नडिगांना दृष्टिकोन दिला’
‘आम्ही कन्नड जनतेला दृष्टिकोन देऊन सकारात्मक आणि विकासकेंद्रीत मोहीम राबवली आहे’, असा दावा काँग्रेसने मंगळवारी केला. ‘भाजपच्या प्रचाराचा उद्देश केवळ जनतेचे लक्ष विचलित करणे, फूट पाडणे आणि फसवणे हा आहे’, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या ‘पाच हमी’ आश्वासनासंदर्भातील जाहिरातीचा फोटो टॅग करत रमेश यांनी, ‘शेतकरी आणि मच्छिमार समाजाला दिलेल्या आश्वासनामुळे वाढत्या महागाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल. तसेच पुढील पाच वर्षांत त्यांच्या उत्पन्नात भर पडेल’, असेही म्हटले आहे.
गोव्यात मतदानाची सुट्टी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील भाजप सरकारने आज, बुधवारी सुट्टी जाहीर केली आहे. यात खासगी आस्थापने आणि औद्योगिक कामगारांचाही समावेश असेल. शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकातील अनेक जण गोव्यात नोकरी-व्यवसायानिमित्त राहात असल्याने त्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारचा हा निर्णय विरोधी पक्ष आणि उद्योग संघटनांना रुचलेला नाही. या सुट्टीच्या विरोधात न्यायालयात जावे लागेल, असे गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनने म्हटले आहे. तर गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सुट्टीचे समर्थन करताना, गेल्यावर्षी गोव्यातील मतदानाच्या दिवशी कर्नाटकात सुट्टी जाहीर करण्यात आली होती, याकडे लक्ष वेधले.