टाटा मोटर्स शेअर्सची वाटचाल
देशांतर्गत शेअर मार्केटच्या चढउतारात टाटा समूहाच्या या कंपनीचा शेअर रॉकेट स्पीडने धावत आहे. शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मोठा फायदा होत असताना तज्ज्ञ स्टॉक खरेदीचा सल्लाही देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत कंपनीचा स्टॉक ७०० रुपये प्रति स्टॉकचा टप्पा गाठू शकतो.
आतापर्यंत तोट्यात चालणाऱ्या या कंपनीने यंदा नफा नोंदवला आहे. या दरम्यान १२ मे रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठकही होणार असून मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी यावेळी गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर करण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्सच्या शेअर्समधील तेजीचे कारण काय?
टाटांची ऑटो कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजमधील एकूण हिस्सेदारी केवळ ७४.६९% तर अल्फा टीसी होल्डिंग्ज पीटीई आणि टाटा कॅपिटल ग्रोथ यांचा अनुक्रमे ७.२६ टक्के आणि ३.६३% हिस्सा आहे. जेव्हापासून कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे संपर्क साधला तेव्हापासून टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजीने व्यवहार होत आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजचा स्टॉक पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. म्हणजे कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे स्टेक कमी करतील ज्याच्या बदल्यात नवीन शेअर्स जारी केले जातील. लक्षात घ्या की टाटा मोटर्स टाटा टेक्नॉलॉजीजने या IPO द्वारे आपला स्टेक कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे.
टाटा मोटर्स शेअर्सवर ब्रोकरेजचा सल्ला काय?
टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांत सुमारे ५% बंपर उसळी पाहायला मिळाली असून तब्बल २२ अंकांपेक्षा जास्त वाढीसह मंगळवारी शेअर ५०४.६५ रुपयांवर क्लोज झाला. तर आज बुधवारी सकाळपासून शेअरमध्ये तेजी दिसत आहे. याशिवाय टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तेजी पाहायला मिळत असून देशांतर्गत ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदीचा (Buy) सल्ला दिला आहे.