पालघर : ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलेल्या डहाणू तालुक्यातील केतखाडी येथील प्रसाद सावे यांनी ऑर्किड या फुलाची फुलशेती करत अनोखा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. पालघर जिल्ह्यात बहुतांश भातशेती केली जाते, मात्र तरीही पर्यायी शेतीकडे वळून या ऑर्किड फुलशेतीतून प्रसाद सावे यांना महिन्याकाठी लाखोंचं उत्पन्न मिळत आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील केतखाडी येथील प्रसाद सावे यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन पदवी मिळवली आहे. उच्चशिक्षित असून सुद्धा प्रसाद सावे यांनी आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवत फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. ऑर्किड या फुलाची लागवड पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोणीही केली नसून यात उत्तम नफा असल्याने प्रसाद यांनी ऑर्किड फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी गोवा, दिल्ली, कलकत्ता या ठिकाणी जाऊन ऑर्किड फुलशेती कशाप्रकारे करतात याची पाहणी करत फुलशेतीची प्रक्रिया जाणून घेतली.

शेतात काय घडतंय,क्षणाक्षणाची अपडेट फोनवर मिळणार, शेतकऱ्याची भन्नाट आयडिया, अफलातून प्रयोगाची सर्वत्र चर्चा
जिल्ह्यात कुठेही ऑर्किड फुलशेती केली जात नसल्याने जोखीम असल्याचं लक्षात घेऊन प्रसाद यांनी आपल्या साडेतीन एकर जागेत शेडनेट उभारून ऑर्किड फुलाच्या रोपांची लागवड केली. यासाठी प्रसाद यांनी बँकॉक येथून ऑर्किड या रोपांची आयात केली. आपल्या साडेतीन एकर जागेत शेडनेट उभारत एकरी मागे ४० हजार ऑर्किड फुलांच्या रोपांची लागवड केली. सध्या साडेतीन एकर जागेत त्यांनी दीड लाखांच्या जवळपास ऑर्किड फुलांच्या रोपांची लागवड केली आहे.

ऑर्किड फुलांच्या लागवडीसाठी मोठा खर्च येत असला तरी एकदा या रोपांची लागवड केली की किमान सहा ते सात वर्षे उत्पन्न मिळतं. सध्या ऑर्किड फुलाच्या एका स्टिकची किंमत २० ते २५ रुपये मिळत असून महिन्याकाठी किमान ५० ते ६० हजार स्टिक विकल्या जात असल्याचं प्रसाद सावे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे प्रसाद सावे यांना या ऑर्किड फुलशेतीपासून महिन्याकाठी १५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.

Akola News: आठवड्याला १३ क्विंटल उत्पादन, खारपाण पट्टयात फुलवली शिमला मिरचीची शेती; शेतकऱ्यांची लाखोंची कमाई
सध्या सुशिक्षित तरुण नोकरीनिमित्त शहरांकडे वळत असून आपल्या पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवताना दिसतात. मात्र याच शेतीत योग्य प्रकारे प्रशिक्षण, माहिती घेऊन नाविन्यपूर्ण प्रयोग केल्यास या तरुण शेतकऱ्यांना आपली आर्थिक घडी मजबूत करण्यात फार काळ लागणार नाही हे प्रसाद सावे यांनी सिद्ध केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here