खुद्द संजय राऊत यांनी ट्वीट करून दुपारी पवारांशी झालेल्या भेटीची माहिती दिली होती. ‘होय, मी माननीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील व देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही,’ असं त्यांनी म्हटलं होतं. तेव्हाच या भेटीत काहीतरी महत्त्वाचं असेल, असे आडाखे बांधले जात होते.
सुशांतसिंह प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारवर विशेषत: ठाकरे कुटुंबीयांवर आरोप होत आहेत. मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड चालवले जात आहेत. त्यामुळं राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत होती. विरोधकांचे आरोप सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र यांनी सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यातून विरोधकांना आणखी बळ मिळाले होते.
महाराष्ट्र सरकारनं सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली असली तरी बिहार सरकारनं परस्पर हे प्रकरण सीबीआयकडं सोपवलं होतं. तसंच, केंद्रानंही चौकशीला सुरुवात करण्याचे संकेत दिले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली होती. पवारांसारख्या नेत्यानं पुढं येऊन या प्रकरणावर भाष्य करावं. तसं केल्यास या प्रकरणातील राजकीय धुरळा खाली बसेल, असा शिवसेनेचा होरा असावा. राऊतांनी पवारांकडे हीच अपेक्षा व्यक्त केली असावी, अशीही एक चर्चा आहे. पवारांनी आता याबाबत भूमिका मांडल्यानंतर व मुंबई पोलिसांची पाठराखण केल्यानंतर तरी हे प्रकरण थंड होते का, याबाबत उत्सुकता आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times