अमरावती : एक वर्षांपासून सुरू असलेले प्रेम प्रकरण ब्रेक अपवर पोहोचले. मात्र, प्रियकर ब्रेकअप करण्यासाठी तयार नव्हता. तर, प्रेयसी आपल्या भूमिकेवर ठाम होती. त्यातून झालेल्या वादात प्रियकराने प्रेयसीची कटरने हल्ला चढवून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी ही घटना बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील वडुरा शिवारात उघडकीस आली. जखमी प्रियकरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोहम गणेश ढाले (वय १९, रा. परतवाडा) असं जखमी आरोपीचे नाव आहे. सोहम आणि त्याची प्रेयसी हे दोघेही बडनेरा परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती आणि तंत्रज्ञान शाखेत प्रथम वर्षाला शिकत होते. शिक्षणासाठी ते दोघेही साईनगर परिसरात भाड्याने वेगवेगळ्या खोली करून राहत होते. त्यांच्यात गेल्या एक वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोहमच्या त्रासामुळे मृत तरुणी कंटाळली होती. ती सोहमसोबत ब्रेकअप करणार होती. परंतु, सोहम ब्रेकअप करण्यासाठी तयार नव्हता. त्यावरच चर्चा करण्यासाठी मंगळवार म्हणजेच ९ मे रोजी दोघेही आपापल्या खोलीवरून एकमेकांना भेटायला निघाले. दरम्यान, मृत तरुणी आणि सोहम शिवारातील एका नाल्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे नागरिकांना दिसून आले. घटनास्थळी तरुणीची दुचाकीही आढळून आली. नागरिकांनी तातडीने घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच बडनेराचे ठाणेदार नितीन मगर यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. तात्काळ संजना आणि सोहम यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले, तर सोहमवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी घटनास्थळी ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणी मृतक तरुणीचे चुलत भाऊ अमित दिलीपराव वानखडे (वय ३७, रा. शंकरनगर) यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.”सोहम हा आपल्याला खूप मानसिक त्रास देतो. वारंवार जिवानिशी मारण्याची धमकी देऊन आपल्याला मारहाण करतो”, असं तरुणीने आपल्यासह तिच्या मोठ्या भावाला सांगितले होते. सोहमनेच तरुणीची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवर शस्त्राने वार करून जखमी करून घेतले, असं अमित वानखडे यांनी तक्रारीत नमूद केले. प्राथमिक तपास आणि तक्रारीवरून पोलिसांनी सोहमविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here