म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील प्रवाशांना नाश्त्यामध्ये बुरशीयुक्त ब्रेड-बटर देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. प्रवाशांनी याबाबत तक्रार दाखल करताच आयआरसीटीसीने कंत्राटदारांवर कारवाई करत त्याला दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. या घटनेमुळे मेल-एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रवाशांकडून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

मुंबई सेंट्रल येथून सुटलेल्या शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मंगळवारी सकाळी चहा आणि नाश्ता देण्यात आला. एक्स्प्रेसमधील सी-१ डब्यातील नाश्त्यामध्ये देण्यात आलेल्या ब्रेड-बटरमधील ब्रेडला बुरशी लागल्याचे कांदिवली येथे राहणारे प्रवासी संजय मिश्रा यांच्या निर्दशनास आले. याबाबत त्यांनी सहप्रवाशांना सांगितले असता अन्य चार ते पाच प्रवाशांना देखील बुरशी आलेला ब्रेड मिळाल्याचे दिसले.

संतापलेल्या प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढल्याने सुरत स्थानकात गाडी थांबवण्यात आली. याबाबत संजय मिश्रा यांनी आयआरसीटीसीकडे तक्रार दाखल करून त्याचा फोटो ट्वीट केला. स्थानकात डॉक्टरांकडून प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ‘ब्रेडच्या वापराची अंतिम तारीख उलटल्यामुळे त्याला बुरशी आल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपासणीसाठी तो प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे,’ असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘या प्रकरणी गाडीमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून त्याला दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, प्रवाशांना नाश्त्याचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,’ असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक राहूल हिमालयन यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here