“काल माझा लग्नाचा वाढदिवस होता. त्यात ईडीने मला नोटीस पाठवली, संध्याकाळी ५ वाजता सही झाली आणि ६ वाजता नोटीस माझ्या घरी आली. पण त्या नोटिशीमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. पण त्यातल्या काही फाईल नंबर काढून बघितल्या तर, असं दिसतंय की आयएलएफएस नावाची कुठली संस्था आहे आणि त्याच्याशी माझा आयुष्यात काही संबध आला नाही. कधी आयएलएफएसचं कर्ज घेतलं नाही, त्यांच्या दारात मी कधी गेलो नाही. कधी कुणाशी बोललो नाही. त्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध नाही. तरी आता बोलावलंय म्हटल्यावर कालच एका हवालदाराने ६ वाजता माझ्याकडे येऊन ही नोटीस मला दिली. आता त्यांची जी काही चौकशी असेल, त्याला सामोरे जाऊ. पण आता दोन ते तीन दिवस लग्नसराई आहे. घरातल्या जवळच्यांची लग्न पण आहेत. त्यामुळे ईडीकडे वेळ मागणारं पत्र मी आज पाठवून देईन”, असंही जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
“जयंत पाटलांना आजच्या सत्तासंघर्षाचा निकालाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला ही नोटीस आली आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, “ईडीची नोटीस कशासाठी आहे ते भारतात सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना जी सोयीची तारीख अथवा वेळ वाटते त्यावेळी ते तशी नोटीस देणार, त्याला काही इलाज नाही. त्यामुळे जी नोटीस आहे, त्याला उत्तर देणं, त्याला सामोरं जाणं, हे आम्ही करु. कारण माझं सगळं राजकीय आयुष्य हे खुली किताब आहे, माझा काही प्रॉब्लेम नाही, कुणाशी काही चुकीचे व्यवहार करण्याचा तसेच घोटाळा करण्याचा कार्यक्रम मी कधी केलेला नाही. त्यामुळे मला खात्री आहे. त्यांना आवश्यक असणारी सर्व माहिती मी देईनच. पण कोणत्याही स्वरुपात मनी लाँन्ड्रिंग प्रकारच्या कोणत्याही गोष्टी मी कधीच केलेल्या नाहीत. त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.