थिरुअनंतपुरम: केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील कोट्टाराकार तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णालयात रुग्णानं महिला डॉक्टरवर कात्रीनं हल्ला करुन तिचा जीव घेतला. पोलिसांनी रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात नेलं होतं. बुधवारी सकाळीच्या सुमारास ही घटना घडली. वंदना दास असं हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरचं नाव आहे. त्या केरळच्या कोट्टायमची रहिवासी होत्या. २३ वर्षांच्या वंदना हाऊस सर्जन म्हणून कार्यरत होत्या.संदीप नेदुमपारा असं आरोपीचं नाव असून तो पेशानं शिक्षक आहे. त्याचं कुटुंबातील काहींशी वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. त्यात संदीप जखमी झाला. त्यानंतर त्याला कोट्टाराकारामधील रुग्णालयात आणण्यात आलं. पहाटे चारच्या सुमारास त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टर त्याच्या जखमेवर मलमपट्टी करत होते. तेव्हा संदीपनं तिथेच असलेल्या कात्रीनं डॉक्टरांवर हल्ला केला. त्यानं डॉ. वंदना यांना कात्रीनं भोसकलं. संदीपनं चढवलेल्या हल्ल्यात डॉक्टरांसह पाच जण जखमी झाले. त्यात पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.हल्ल्यानंतर डॉक्टरांना तिरुअनंतपुरममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक भूमिका घेत राज्यभरात कामबंद आंदोलनाची हाक दिली. डॉक्टरांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान रुग्णालयात पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.या घटनेनंतर राजकारण तापलं आहे. महिला डॉक्टर अननुभवी होती. त्यामुळे हल्ला झाल्यानंतर ती खूप घाबरली, असं केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या. यानंतर काँग्रेसनं जॉर्ज यांच्या विधानावर टीका केली. आरोग्य मंत्री डॉक्टरांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचं काँग्रेस कमिटीनं म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here