राजापूर, रत्नागिरी : कोकणात राजापूर बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचा विरोध आता थेट लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचला आहे. रिफायनरीला असलेल्या विरोधाची आता विविध कार्यक्रमांधूनही थेट जनजागृती व्हावी असा जणू चंगच रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बांधलेला दिसत आहे. धोपेश्वर येथील लग्नात नववधू व वराने हातात पाटी धरली आणि पाटीवर लिहिलेला विरोधाचा संदेशच या लग्न सोहळ्यातून दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या अथक प्रयत्नानंतरही काहींचा विरोध अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे कार्यकर्ते चि. गुरुप्रसाद रमेश मसुरकर आणि चि. सौ. का. स्वाती गुरुप्रसाद मसुरकर (धोपेश्वर गाव, वाडी मसुरकरवाडी) यांनी आपल्या लग्न सोहळ्यात ‘एकच जिद्द, रिफायनरी रद्द’ असा संदेश वऱ्हाड्यांना दिला. आणि रिफायनरी प्रकल्पाला कोकणी माणसाचा किती टोकाचा विरोध आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
रिफायनरीच्या सर्वेक्षणाचे काम आता पूर्ण
रिफायनरीच्या सर्वेक्षणाचे काम आता पूर्ण
रिफायनरी प्रकल्पासाठी ड्रिलिंग करून मातीच्या सर्वेक्षणाचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. याला मोठा विरोध झाल्याने त्यावरून मोठा तणाव या ठिकाणी निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने बैठका घेऊन या प्रकल्पविषयी असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग आणि जिल्हा परिषद धनंजय कुलकर्णी यांनी ही सगळी परिस्थिती कल्पकतेने मोठ्या संयमाने हाताळली होती.
दरम्यान, बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्या सहकाऱ्यांची सुटका करावी म्हणून रिफायनरी विरोधी संघटना गेले दोन ते तीन दिवस या परिसरात आक्रमक झाली होती. या सगळ्यांची जामीनावर सुटका होऊन हे पदाधिकारी व कार्यकर्ते गुरुवारी आपल्या गावात परतले आहेत.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News