म. टा. प्रतिनिधी, ठाणे : दोन आठवड्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून मुलाने वृद्ध आई-वडिलांवर सुरीने केलेल्या हल्ल्यामध्ये आईचा मृत्यू, तर वडील गंभीर जखमी झाले. ठाण्यातील घोडबंदर भागात गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. कासारवडवली पोलिसांनी या प्रकरणी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ मुंबईतील कुर्लातल्या नेहरुनगरमधून अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.घोडबंदर भागातील विहंग हिल्स, फेज दोनमध्ये ७१ वर्षाचे विलास भाटकर आणि पत्नी विनीता (वय ६१) असे दोघेच राहतात. त्यांचा मुलगा संकल्प (वय ३१) हा ठाणे पूर्वेकडील अष्टविनायक चौकातील एका सोसायटीमध्ये राहतो. दोन आठवड्यापूर्वी आई-वडिलांसोबत त्याचे भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून संकल्प गुरुवारी सकाळी आई-वडिलांच्या घरी आला. त्याने आई विनीता आणि वडील विलास यांच्यावर सुरीने वार केले. या हल्ल्यामध्ये आईचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घोडबंदर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर संकल्प दुचाकीवरून पळून गेल्याने त्याचा शोध घेण्यासाठी कासारवडवली पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली. या पथकाने काही वेळातच संकल्पला मुंबईतील कुर्लातल्या नेहरुनगर येथून अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. Mumbai Crime: आई शेजाऱ्यांकडे गेली, भावासमोरच बहिणीला खोलीत खेचलं अन्…; २२ वर्षीय तरुणाचं क्रूर कृत्य मोठ्या भावाच्या तक्रारीनंतर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली संकल्पविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विवाहित असलेला संकल्प जीममध्ये प्रशिक्षकाच्या कामासह बॉडीबिल्डींगही करतो. मात्र, काहीतरी चांगले काम करण्याबाबत त्याला आई-वडील सांगत होते. परंतु, आई-वडील आपला तिरस्कार करत असल्याचा राग त्याच्या मनात होता. यातूनच हा प्रकार घडल्याची शक्यता एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. आईची हत्या केल्याचा संकल्प याला कोणताही पश्चाताप नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.