यशस्वी जैस्वालनं १३ बॉलमध्ये ५० धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम २०१८ मध्ये टीम इंडियाचा खेळाडू के.एल. राहुल याच्या नावावर होता. के. एल. राहुल यानं १४ बॉलमध्ये विक्रम केला होता. याशिवाय २०२२ मध्ये पॅट कमिन्सनं देखील १४ बॉलमध्ये ५० धावा पूर्ण केल्या होत्या. के.एल. राहुलनं हा विक्रम पंजाबकडून खेळताना दिल्लीच्या संघाविरुद्ध केला होता. तर, पॅट कमिन्सनं हा विक्रम केकेआरकडून खेळताना मुंबई विरुद्ध केला होता.
राजस्थानच्या संघानं कोलकातानं दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जैस्वालनं केकेआरचा कप्तान नितीश राणा याच्या पहिल्या ओव्हरमध्ये २६ धावा केल्या. त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये तीन चौकार, दोन षटकार आणि दोन धावा अशा एकूण २६ धावा पहिल्या ६ बॉलमध्ये केल्या. तर, पुढच्या ७ बॉलमध्ये २४ धावा काढत जैस्वालनं अर्धशतक पूर्ण केलं.जैस्वालनं ४७ चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकारांसह ९८ धावा केल्या. तर, राजस्थानचा कप्तानं संजू सॅमसननं ४८ धावा केल्या.

विराटकडून यशस्वीचं कौतुक
यशस्वी जैस्वालवर कौतुकाचा वर्षाव
यशस्वी जैस्वालच्या वादळी खेळीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाचा माजी कप्तान आणि आरसीबीचा प्रमुख खेळाडू विराट कोहलीनं देखील यशस्वीच्या खेळीचं कौतुक केलं आहे. मी पाहिलेल्या बॅटिंगपैकी ही बेस्ट खेळी होती. काय टॅलेंट आहे, असं म्हणत विराट कोहलीनं यशस्वी जैस्वालचं कौतुक केलं आहे. तर, यशस्वीनं ज्या के.एल. राहुलचं रेकॉर्ड मोडलं त्यानं देखील अनोख्या पद्धतीनं कौतुक केलं आहे. राहुलनं एक ट्विट करत यशस्वी जैस्वालला सलाम ठोकला आहे.