म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकर) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल विरोधात गेला असला तरी राजकीयदृष्ट्या त्यांचे हे पाऊल योग्यच होते. त्यामुळेच त्यांच्या बाजूने सहानभुतीची मोठी लाट उभी राहू शकली. खटल्यापेक्षा त्यांना जनतेतून मिळणारा पाठिंबा अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळेच शिंदे-भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकारबाबत निर्णय घेता आला असता. मात्र, त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने सरकारची पुनर्स्थापना करता येते येणे शक्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांनी आपण हे पूर्वीच म्हटले असल्याचे दाखले देण्यास सुरुवात केली आहे.

Supreme Court Verdict: निकाल विरोधात गेला पण उद्धव ठाकरेंचा फायदा होणार, जाणून घ्या नक्की काय घडलं?

काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याचवेळी उद्धव यांनी हे चुकीचे पाऊल उचलल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत राजीनामा देताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, याबाबत नाराजीचा सूर आळवला आहे. मात्र, उद्धव यांनी हा निर्णय काही घटनातज्ज्ञांना विचारूनच केली होती, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे घटनात्मकदृष्ट्या योग्य की अयोग्य याचा विचार करण्यापेक्षा त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्याच या राजीनाम्याबाबत विचार केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

Supreme Court Verdict Maharashtra Crisis : ‘सर्वोच्च’ ताशेरे; पण शिंदे वाचले!

या सत्तेत जीव रमत नाही, असे आपल्या जनाधाराला दाखविण्याचा, आपण ज्यांना पक्षात मोठे केले, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा त्यांच्या दरवाजाकडे नेऊन ठेवली त्यांनी आपल्याशी गद्दारी केली असून विधिमंडळात त्यांच्याकडे सत्तेची भीक मागण्यापेक्षा मी स्वाभिमानाने हे पद सोडतो, असे सांगत उद्धव यांनी वर्षा बंगलाही तत्काळ सोडला. त्यामुळे त्याचवेळी वर्षा ते मातोश्री या प्रवासात त्यांच्यासाठी हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले पाहायला मिळाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्रातून जी सहानुभुतीची लाट उभी राहिली. त्यांनी उचललेल्या या राजीनाम्याच्या पावलामुळेच जनाधार सोबत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता व विधिमंडळात ते विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असते तर त्यांच्या विरोधात शिंदे समर्थकांनी त्याहीवेळी मतदान केलेच असते. कदाचित घटनात्मक पेचांमध्ये हे त्यांचे पाऊल योग्य ठरले असते तरी राजकीयदृष्ट्या त्यांच्या जनाधारासमोर शिंदेकडून पराभाव झाल्याने आज त्यांच्याबाजूने उभी राहिलेली सहानुभूती त्यांच्या वाट्याला आली नसती, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here