म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मेट्रो-३ मार्गासाठी आरे कॉलनीतील वृक्षांची कत्तल करून कारडेपो उभारण्याबाबतचा वाद कायम असताना एमएमआरडीए आपल्या तीन मेट्रो मार्गांसाठी मिळून एकच विशाल व दुमजली कारडेपो चेंबूरच्या मंडाळे येथे उभारत आहे. तब्बल ३१ हेक्टर जागेवर हा कारडेपो उभारला जात असून, त्यास ‘स्टेट ऑफ द आर्ट कारडेपो’ असे संबोधले जात आहे.

दहिसर ते डी. एन. नगर, डी. एन. नगर ते मंडाळे व दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असे तीन मेट्रो मार्ग एमएमआरडीए उभारत असून, या मार्गांसाठीची बांधकामेही सुरू झाली आहेत. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर व हार्बर मार्ग असे तीन विभाग या मेट्रो मार्गांनी जोडले जाणार आहेत. त्यामुळे तिन्ही विभागातील दळणवळण अधिक जलद होणार आहे. मंडाळेच्या पुढे हे मार्ग भविष्यात नवी मुंबई मेट्रोलाही जोडले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई व नवी मुंबईतील अंतर अधिक कमी होऊन प्रवास जलद होईल.

तिन्ही मेट्रो मार्गांसाठी एकच कारडेपो असेल. आठ डब्यांच्या ७१ गाड्या ‘पार्क’ करण्याची सुविधा डेपोत उपलब्ध असेल. म्हणजे तब्बल ५७६ डबे येथे सामावू शकतात. गाड्यांची दैनंदिन देखभाल तसेच दुरुस्तीसाठी नऊ अद्ययावत वर्कशॉप असतील. या वर्कशॉपमध्ये आठ व सहा डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात. गाड्या धुतल्यानंतर दूषित पाण्यावर प्रक्रिया तसेच पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्पही या डेपोत असेल. गाड्या धुण्यासाठी अद्ययावत यंत्रणा असेल. गाड्या उभ्या करण्यासाठी डेपो अंतर्गत तब्बल २७ किमीचा ट्रॅक असेल. हा कारडेपो दुमजली असेल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here