पुणे : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची आज दुपारी तळेगाव नगरपरिषदेसमोर अज्ञात व्यक्तींनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली. गेल्या दहा वर्षापासून आवारे हे स्थानिक राजकारणात सक्रिय होते. त्यांनी त्यांच्या जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले होते. एवढेच नाही तर सोलरवर चालणारे पहिले गाव जे मावळ तालुक्यात तयार झाले आहे त्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.

सुनील अण्णांना नडले, सात नगरसेवक निवडून आणले

सामाजिक कार्यात किशोर आवारे यांचा मोठा वाटा होता. समाजात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून किशोर आवारे यांनी राजकारणात आपले स्थान बळकट केले होते. विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके आणि किशोर आवारे हे कट्टर विरोधक असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

तळेगाव आणि मावळच्या राजकारणात आवारे यांनी हळूहळू जम बसवायला सुरुवात केली होती. सध्या तळेगाव नगरपालिकेत त्यांचे सात ते आठ नगरसेवक आहेत. लक्ष्मण जगताप यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून आवारे यांची ओळख होती.

पुण्याच्या किशोर आवारे यांची भरदुपारी चौकात हत्या, गोळीबार करुन आणि कोयत्याने वार
घरातूनच राजकीय वारसा मिळाला

तसेच सोमाटणे टोलनाका बंद व्हावा म्हणून त्यांनी उपोषण आणि आंदोलने देखील केली होती. त्या आंदोलनाचा राज्य सरकारने दखल घेत टोलनाका बंद करण्याचे आश्वासन देखील आवारे यांना शासनाने दिले होते. मात्र त्या अगोदरच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांना राजकीय वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. त्यांची आई देखील नगरसेविका होती. भाऊ सुद्धा नगरसेवक होता. आईने नगराध्यक्ष पद देखील भूषवले आहे.

किशोर आवारे यांना नुकताच पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने डॉ.निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. याशिवाय कोरोंना काळात त्यांनी मोठे कार्य स्व खर्चातून केले होते. त्याची दखल अनेक समाजिक संस्थांनी घेतली होती. तळेगाव दाभाडे येथील एक मोठे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांचेच परिचित होते.

आवारेंच्या खुनाचा आणि सोमाटणे टोलनाक्याचा काही संबंध?

चार अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोराचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोमाटणे टोलनाका टोलमुक्त व्हावा यासाठी किशोर आवारे हे सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून लढा देत होते. त्याचा संदर्भ या हल्ल्याशी आहे का? हे तपासले जाणार आहे. आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

हल्लेखोरांच्या मागावर चार पथके

किशोर आवारे यांच्यावर सहा हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हे शाखेचे चार तपास पथके तयार करून हल्लेखोरांच्या मागावर पाठवली आहे.

किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हल्ला झाला आहे. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला असून त्यांच्या मागावर पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
– पद्माकर घनवट, सहाय्यक पोलिस आयुक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here