मुंबई : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केल्याची माहिती आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या आर्यन खान याच्या सुटकेसाठी समीर वानखेडेंनी त्याचे वडील आणि बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे, तसंच वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हादेखील सीबीआयने दाखल केला आहे. त्यामुळे आता वानखेडेंसमोरील अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.
आर्यन खान प्रकरणांनंतर एनसीबीकडून समीर वानखेडे यांची चौकशी चालू होती. एनसीबीच्या दक्षता समितीकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्यासंदर्भातील प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती. या समितीने वानखेडेंच्या बेहिशोबी मालमत्तेचा अहवाल तयार करून सीबीआयला दिला होता.

२०२१ साली समीर वानखेडेंच्या नेतृत्वात एनसीबीने मुंबईतील एका क्रूझवर धाड टाकली होती. या धाडीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. देशभर हे प्रकरण खूप गाजले होते. या कारवाईनंतर समीर वानखेडे देशभर चर्चेत आले होते. पुढे न्यायालयीन सुनावणी दरम्यान आर्यन खान याची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. यासोबतच न्यायालयाने समीर वानखेडेंच्या टीमवर जोरदार ताशेरे देखील ओढले होते.
दरम्यान, एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडून २५ कोटींच्या लाचेची मागणी केली होती, असा आरोप केला होता. त्याच प्रकरणात आता सीबीआयने समीर वानखेडे यांच्या घरावर छापा टाकत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.