अशी पार पडली निवडणूक:
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार असून राज्यात २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झाले आहे. राज्यात ५८,५४५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती. कर्नाटक निवडणूक आखाड्यात एकूण ५०५३ उमेदवारांनी अर्ज भरला होता. मात्र ५०२ अर्ज बाद ठरले आणि ३९५३ अर्ज स्वीकारण्यात आले. त्याचबरोबर ५६३ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले होते. त्यामुळे एकूण २६१५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यापैकी २४२९ पुरुष उमेदवार, १८५ महिला उमेदवार, १ ट्रान्सजेंडर, ९१८ अपक्ष उमेदवार आहेत. या निवडणूकीत चिक्कबल्लापुरा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ८५.५६ टक्के मतदान झाले, त्यानंतर बंगळुरू ग्रामीणमध्ये ८५.०८ टक्के मतदान झाले, तर राज्यात सर्वांत कमी ५२.३३ टक्के मतदान बृहन्बंगळुरू महापालिका दक्षिण हद्दीत बंगळुरू शहर येथे नोंदविले गेले असून या सर्व उमेदवरांनचे भवितव्याचा फैसला काही तासात होणार आहे.
कर्नाटकातील मतदारांचा आढावा :
कर्नाटकात एकूण मिळून ५कोटी २१लाख ७६हजार ५७९ मतदार आहेत. यामध्ये २,६२,४२,५६१ पुरुष मतदार असून २,५९,२६,३१९ महिला मतदार आहेत. तर ४८३९ इतर मतदार आहेत. ५,५५,०७३ मतिमंद मतदार, ८० वर्षांवरील १२,१५,७६३ आणि १०० वर्षांवरील १६,९७६ मतदार आहेत. तसेच यंदा ९,१७,२४१ मतदारांनी पहिल्यांदा मतदानासाठी नोंदणी झाली आहे. राज्यात एकूण मतदान ७३.१९ टक्के मतदान झाले आहे. विशेष म्हणजे याबद्दल पुरुष मतदारांबरोबरच महिला मतदार देखील एक समान असल्याने महिलांचा कौल नेमका कोणाला मिळाला यावर विजयी पक्ष ठरणार आहे. यामुळे मतदारांनी कुणाला कौल दिला आहे आज संध्याकाळपर्यंत समजेल.
कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी ११३ ची मॅजिक फिगर :
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे गणित पाहता विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी किमान ११३जागांची आवश्यकता आहे. त्यापैकी अनुसूचित जाती (SC) साठी ३६ जागा आणि अनुसूचित जमाती (ST) साठी १५ जागा राखीव आहेत. २०१८ च्या निवडणूकीचा निकाल पाहता भारतीय जनता पक्षाचे १०४, काँग्रेसकडे ८० आणि जेडीएसकडे ३७ जागा होत्या. आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष असून पुन्हा भारतीय जनता पक्ष पक्षाला कमळ फुलवण्यात यश मिळेल का? काँग्रेसला सत्ता मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण या निवणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलें असून कर्नाटक विधानसभा निवडणूक ही आगामी वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. बेळगाव मध्ये मराठी माणसाची ओळख असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समिती एकूण पाच जागांवर निवडणूक लढवत असून यापैकी दोन ते तीन जागावर महाराष्ट्र एकीकरण समिती जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आता थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहेत.