म. टा. प्रतिनिधी, मुंबई

‘दहा वर्षांपूर्वी माझ्याबाबतीत चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडून जो आक्षेपार्ह प्रकार घडला त्याविषयी तक्रार दाखल केल्यानंतर पाटेकर यांचे वकील अॅड. नीलेश पावसकर यांनी माझ्यावर दबाव आणला. पावसकर हे अनेक प्रकरणांत नाना पाटेकर यांचे वकील असतानाही त्यांनी ते माझ्यापासून जाणीवपूर्वक लपवले आणि माझ्याकडून तक्रारीविषयीची मूळ कागदपत्रे घेऊन माझी फसवणूक केली,’ असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने मंगळवारी अंधेरीमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला. त्याचवेळी ‘पाटेकर यांच्याविरोधात तनुश्रीतर्फे खटला लढत असल्याने मला काही लोकांकडून लक्ष्य केले जात आहे,’ असा आरोप तनुश्रीचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी केला. नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू, असा उल्लेख करत तनुश्रीने टीकास्त्र सोडले.

‘पाटेकर यांच्याविरोधात दहा वर्षांपूर्वी तक्रार केली तेव्हा अॅड. पावसकर हे स्वत:हूनच मला भेटले आणि त्यांनी मला मदत करण्याचे आश्वासन दिले. पाटेकर हे बडे प्रस्थ असल्याने ते तुम्हाला तुरुंगात टाकतील वगैरे सांगून त्यांनी माझ्यावर दबाव आणला आणि माझ्याकडून चित्रपटातील कामाविषयीच्या मूळ कंत्राटाची प्रत व अन्य कागदपत्रेही नेली. मात्र, ते अनेक प्रकरणांत पाटेकर यांचे वकील आहेत, ही बाब त्यांनी माझ्यापासून दडवली होती,’ असा आरोप तनुश्रीने केला.

‘नाना पाटेकर ढोंगी’

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू, असा उल्लेख करत तनुश्रीने टीकास्त्र सोडले. नाना पाटेकर यांच्याकडून विनयभंग झाल्याच्या प्रकरणात मी पीडित असताना त्या काळात बॉलीवूडमधील काही लोकांनी जाणीवपूर्णक माझ्याविरोधात खूप बदनामीकारक माहिती पसरवली. त्यामुळे माझे करिअर उद्ध्वस्त झाले. नाना पाटेकर हे ढोंगी आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या नावाखाली आणि पूरपीडितांसाठी पाचशे घरे निर्माण करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून देश-परदेशांतून जमवला. मात्र, त्याचा वापर कसा आणि कुठे केला, हे कोणी तपासले का? कोणी त्याविषयीची कागदपत्रे तपासते का? गरीब शेतकऱ्यांच्या नावाखाली त्यांच्याकडून भ्रष्टाचार होत आहे, असा गंभीर आरोपही तनुश्रीने केला.

काय आहे प्रकरण?

सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या हिंदी चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपला विनयभंग केला, अशी तक्रार तनुश्रीने केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी पाटेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. मात्र, तनुश्रीच्या आरोपांत तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांनी गेल्या वर्षी जूनमध्ये न्यायालयात सादर केला. त्याला विरोध दर्शवणारा अर्ज तनुश्रीने केला असून त्यावर १७ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here