या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, कर्नाटकच्या निकालातून एक धडा शिकायला मिळाला आहे की, ‘मोदी है मुमकीने है’, असं काही नसतं. नरेंद्र मोदींनाही हरवता येऊ शकते, असे अंधारे यांनी म्हटले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल, असा प्रश्न यावेळी अंधारे यांना विचारण्यात आला. त्यावर सुषमा अंधारे यांनी म्हटले की, कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रावर असा परिणाम होईल की, ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी तिथे जाऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, गरज नसताना फडणवीसांनी बजरंगबलीचा मुद्दा काढला. परंतु, त्याचा भाजपला फायदा झाला नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात हे कार्ड खेळताना दहा वेळा विचार करतील. धार्मिक हे कार्ड कर्नाटकात चाललं नाही, ते कार्ड फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कोणीही अजिबात चालू देणार नाही. भाजपचे नेते यापासून धडा घेतील. बजरंगबली हा राजकारणाचा नव्हे तर आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. परंतु, भाजप वेगवेगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरते तेव्हा धार्मिकतेचे कार्ड बाहेर काढते, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
संजय राऊतांनी मोदी-शाहांना डिवचले
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना डिवचले. काँग्रेसचा विजय हा कर्नाटकातील भाजपचा पराभव नसून मोदी आणि शाह यांचा हा पराभव आहे. या दोन्ही नेत्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. प्रत्येक निवडणुकीत ते तंबू ठोकतात. पण तरीही कर्नाटकातील जनतेने मोदी आणि शाह यांना झिडकारले, असे संजय राऊत यांनी म्हटले.
कर्नाटकात काँग्रेसला निर्भेळ यश
कर्नाटक विधानसभेची निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत काँग्रेसला धोबीपछाड देऊन दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचा भाजपचा मनसुबा होता. मात्र, आजच्या निकालांनी भाजपच्या या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या एकूण २२४ जागांपैकी १३० जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप ६६ जागा आणि जेडीएस २२ आणि इतर पक्ष सहा जागांवर आघाडीवर आहेत.