मुंबई: देशात चुकीचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना कर्नाटकमधील जनतेने धडा शिकवला. त्यासाठी कर्नाटकमधील जनता आणि बहुमत मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाचे अभिनंदन. आता ही प्रक्रिया संबंध देशात होईल. केरळ, तामिळनाडू,कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल अशा बहुसंख्य राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होतील तेव्हा देशात काय चित्रं असू शकते, याचा अंदाज कर्नाटकच्या निकालांनी येऊ शकतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसने १३४ जागांवर निर्णायक आघाडी घेत भाजपला धूळ चारली. भाजपच्या वाट्याला अवघ्या ६४ जागा येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले.अलीकडच्या काळात केंद्र सरकारकडून विशेषत: भाजपकडून जिथे त्यांचं राज्य नाही, तिथे आमदार फोडून सत्ता बळकावली जाते. त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे सूत्र रुढ झाले आहे. यापूर्वी कर्नाटकमध्येही केंद्र सरकारने तीच अवस्था केली, पहिलं सरकार होतं, तेथे लोक फोडून सरकार घालवले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनीही तेचे केले. मध्यप्रदेशातही आमदार फोडून कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात आले. गोव्यातही भाजपने तेच केले. यंत्रणा आणि साधनसंपत्ती वापरुन सरकार पाडण्याची ही एक नवीन पद्धत सुरु झाली आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे. मात्र, फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही, ही गोष्ट कर्नाटकच्या निकालांनी दाखवून दिली, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. फडणवीस आता महाराष्ट्रात ही एक गोष्ट करताना दहावेळा विचार करतील, कर्नाटक निकालानंतर सुषमा अंधारेंचं भाकीत
कर्नाटकमध्ये भाजपला ६५ ठिकाणी यश मिळाले, तर काँग्रेसला तब्बल १३३ जागांवर यश मिळेल, असे दिसत आहे. याचा अर्थ काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट जागा मिळाल्याचे दिसत आहे. भाजपचा सपशेल पराभव करण्याची भूमिका कर्नाटकच्या जनतेने घेतली. याचे मुख्य कारण भ्रष्टाचार, सत्तेचा, साधनांचा गैरवापर आणि लोक फोडन आपण राज्य करु शकतो, याविषयी सत्ताधाऱ्यांना असलेला विश्वास याविरोधात जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. कर्नाटकमध्ये भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी सभा घेतल्या. याठिकाणी जनतेचा रोष व्यक्त होईल, ही खात्री होती, असे शरद पवार यांनी म्हटले.
कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवले होते. याविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस शक्तिशाली पक्ष नाही. आम्ही एक प्रयत्न म्हणून ७ उमेदवार उभे केले. त्यापैकी निपाणी मतदारसंघातील उमेदवाराला आम्ही शक्ती दिली होती, तिथे काही निर्णय मिळतील, अशी अपेक्षा होती. आतापर्यंत आकडेवारी पाहता, आमचा उमेदवार पहिल्या पाच फेऱ्यांपर्यंत पहिल्या क्रमांकावर होता. पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. अजूनही चार फेऱ्या बाकी आहेत, अंतर सहा हजारांचे आहे. तिथे यश नक्की मिळेल याची खात्री नाही. पण एखाद्या राज्यात एन्ट्री करण्याच्यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला होता. आमचं खरं लक्ष्य हे कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करणे, हेच होते, असे शरद पवार यांनी म्हटले.