बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीएसचा धुव्वा उडवत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. सर्व जागांवरील अंतिम निकाल येणं अद्याप बाकी आहे. मात्र आता मतमोजणीच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असल्याने या कलांमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचं स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी फटाके फोडत विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. मात्र एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि कर्नाटकात बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना काँग्रेसने भाजपच्या सत्तेला कसा सुरुंग लावला, याबाबत आता देशभरात चर्चा होऊ लागली आहे.कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाची ५ मोठी कारणे कोणती?

१. सोशल इंजिनियरिंग

भाजपकडून देशभरातील विविध निवडणुकांमध्ये विकासासोबत आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा केंद्रस्थानी आणला जातो. कर्नाटक विधानसभा निवडणूकही त्याला अपवाद नव्हती. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर बजरंग दलासारख्या संघटनांवर कारवाई करू, असं आश्वासन दिल्यानंतर भाजपने याविरोधात रान पेटवत हा मुद्दा हनुमानाशी जोडला. काँग्रेस हिंदूद्वेषी असल्यामुळेच बजरंग दलावर कारवाई करण्याची भूमिका घेत असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं. मात्र भाजपच्या या धार्मिक अजेंड्याला छेद देण्यासाठी काँग्रेसने विविध जातसमूहांना आपल्याकडे खेचण्यासाठी रणनीती तयार केली. यामध्ये कर्नाटकात प्रभावशाली असणाऱ्या लिंगायत आणि वोक्कालिगा या जातींना आपल्या बाजूला आणण्यात काँग्रेसला यश आलं. अनेक लिंगायत नेत्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पक्षांतराचा काँग्रेसला फायदा झाल्याचं दिसत आहे. त्यासोबतच लिंगायत समाजाच्या वीरशैव लिंगायत फोरम या शक्तिशाली संघटनेनं मतदानाच्या काही दिवस आधी एक पत्रक काढत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. याचाही फटका भाजपला बसल्याचं दिसत आहे. जेडीएसचा पारंपारिक मतदार समजला जाणारा वोक्कालिगा समाजही काँग्रेससोबत आला. याशिवाय ओबीसींमध्ये महत्त्वाचा समजला जाणारा कुरुबा समाज आणि मुस्लिम, दलित हे घटक काँग्रेससोबत राहिले.

Karnataka Election : तुरुंगात टाकलं, दिल्लीत नेऊन एकटं पाडलं, पण ‘काँग्रेसचा चाणक्य’ अख्ख्या भाजपला पुरुन उरला

२. पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यात यश

राजस्थान आणि मध्य प्रदेशप्रमाणे कर्नाटकातही काँग्रेसमध्ये नेतृत्वासाठी रस्सीखेच होती. प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे काँग्रेसचे तेथील दोन प्रमुख चेहरे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद होऊन त्याचे निवडणुकीतही परिणाम होतील, असं बोललं जात होतं. मात्र दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवत पक्षाच्या विजयासाठी सर्व ताकद पणाला लावली. तिकीट वाटपातही काँग्रेसमध्ये एकमत झाला. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्यातील संपूर्ण संघटना एकदिलाने लढली आणि भाजपच्या हातून सत्ता खेचून आणली.

३. सिद्धारामय्या यांचा करिष्मा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिलेले सिद्धारामय्या हे जनमाणसांत प्रचंड लोकप्रिय असलेले नेते म्हणून ओळखले जातात. पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी राहिल्याने आणि लोकांची अचूक नस माहिती असल्याने सिद्धारामय्या यांना तिथे प्रचंड जनाधार लाभला आहे. स्वच्छ प्रतिमेचा नेता अशीही त्यांची ओळख आहे. निवडणूक काळात सिद्धारामय्या यांनी भाजपने सत्ताकाळात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचं सांगत प्रचाराचा धुरळा उडवून दिला. त्यामुळे काँग्रेसला याचा फायदा झाल्याचं निवडणूक निकालातून दिसत आहे.

४. अँटीइन्कम्बन्सीचा फायदा उठवण्यात काँग्रेसला यश

२०१८ साली झालेल्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस या पक्षांनी युती केल्याने सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून वंचित राहावं लागलं. मात्र नंतर राज्यात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं आणि काँग्रेसचे आमदार फोडत पुन्हा भाजपची सत्ता आली. मात्र भाजप सरकारच्या कामाविषयी जनतेत हळूहळू रोष वाढत गेला. हे सरकार प्रत्येक कामात ४० टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार करण्यात आला. तसंच धार्मिक राजकारण, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवरून काँग्रेस बोम्मई सरकारला लक्ष्य केलं आणि सरकारविरोधात लोकांची नाराजी निर्माण होऊन त्याचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात काँग्रेसला यश आलं.

५. राहुल गांधी यांच्या यात्रेचा परिणाम

काँग्रसचे नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी कन्याकुमारी ते काश्मीर अशी देशव्यापी पदयात्रा सुरू केली होती. भारत जोडो यात्रा या नावाने निघालेली ही पदयात्रा कर्नाटकातूनही गेली होती. कर्नाटकात या यात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला होता. सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या यात्रेमुळे उत्साह संचारला. तसंच भाजपला आपण टक्कर देऊ शकतो, असा आत्मविश्वासही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यात भारत जोडो यात्रेला यश आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here