हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादचा या आयपीएलमधील खेळ अखेर खल्लास झाला. कारण या सामन्यानंतर हैदराबादचे १४ गुणच होऊ शकतात, त्यामुळे प्ले ऑफच्या रेसमधून ते आता बाहेर पडले आहेत. लखनौने या सामन्यात विजय साकारला आणि त्यांचे आयपीएलमधील आव्हान कायम राहिले आहे. हैदराबादने लखनौपुढे विजयासाठी १८३ धावांचे आव्हान ठेवले होते, या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करत लखनौने यावेळी विजय साकारला. या सामन्यात हैदराबादच्या चाहत्यांनी लखनौच्या डग आऊटवर रागाच्या भरात काही गोष्टी फेकल्या होत्या आणि त्यामुळे सामना थांबवला गेला होता. पण लखनौने हा सामना जिंकत हैदराबादच्या चाहत्यांचाही बदला घेतला.हैदराबादच्या १८३ धावांचा पाठलाग करत असताना लखनौच्या संघाला काइन मेयर्सच्या रुपात पहिला धक्का बसला, त्याला फक्त दोनच धावा करता आल्या. पण त्यानंतर लखनौच्या संघात नव्याने दाखल झालेला प्रेरक मंकडने हैदराबादच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. प्रेरक आणि मार्कस स्टॉयनिसची चांगली साथ मिळाली. प्रेरक आणि स्टॉयनिस यांची भागीदारी लखनौसाठी मोलाची ठरली. पण यावेळी अभिषेक शर्माने स्टॉयनिसला बाद केले आणि ही जोडी फोडली, त्याने २५ चेंडूंत ४० धावांची खेळी साकारली. स्टॉयनिसचे अर्धशतक हुकले असले तरी प्रेरकने आपले पहिली-वहिली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. प्रेरकच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर लखनौच्या संघाने विजयाच्या दिशेने कूच केली.हैदराबादच्या संघाची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. कारण हैदराबादच्या संघाला तिसऱ्याच षटकात अभिषेक शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला होता. अभिषेकला यावेळी सात धावा करता आल्या. अभिषेक बाद झाल्यावर हैदराबादच्या संघाला एकामागून एक धक्केठराविक फरकाने बसत गेले. त्यामुळे एकाही हैदराबादच्या खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. हैदराबादच्या एकाही खेळाडूला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. पण असे असले तरी एक खेळाडू हैदराबादच्या मदतीला चांगलाच धावून आला. हा खेळाडू होता हेन्रीच क्लासिन. कारण क्सालिनने यावेळी लखनौच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. त्याने यावेळी २९ चेंडूंत ३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४७ धावांची खेळी साकारली. हैदराबादच्या डावातील ही सर्वोच्च खेळी ठरली. लखनौच्या गोलंदाजांनी यावेळी चांगला मारा केला. लखनौचा कर्णधार कृणाल पंड्याने यावाळी २४ चेंडूंत दोन बळी मिळवले.हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८२ धावा केल्या होत्या.