पुणे : पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुळकर यांना महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून ५ मे रोजी अटक केली. पाकिस्तानातील एका महिलेला व्हॉट्सअॅपवरून कॉल आणि मॅसेजद्वारे गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संरक्षण संशोधन संस्थेच्या म्हणजेच DRDO च्या संचालक पदावर काम करत असलेले डॉ. प्रदीप कुरुलकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेतील एका महिलेने कुरुलकर यांना हनीट्रॅप अडकवलं होतं. या प्रकरणावरूनच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली आहे.’हे तेच लोक आहेत जे देशातील मुस्लिमांना पाकिस्तानात जा, असं म्हणतात. मात्र आम्ही वारंवार हेच सांगत होतो की, आम्हाला पाकिस्तानचे काही देणेघेणे नाही. आम्हाला जेव्हा विचारण्यात आले होते की तुम्हाला पाकिस्तानात जायचंय की भारतात राहायचं तेव्हा आम्ही सांगितलं होतं, हा भारत देश आमचा आहे. पण आम्हाला जा म्हणणाऱ्या लोकांना पाकिस्तान जास्त आवडतो. आम्हाला जा जा म्हणणारेच आज पाकिस्तानात जाऊन बसले आहेत. इतकंच नाही तर इथली सगळी गुपितं पण तिकडे पोहोच करत आहेत,’ असा हल्लाबोल जलील यांनी केला आहे. ते आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता माध्यमांशी बोलत होते.
मी माझा शब्द पूर्ण केला, हा संपूर्ण कर्नाटकाचा विजय; विजयानंतर डी. के. शिवकुमारांना अश्रू अनावर
प्रदीप कुरुलकर याच्या आरएसएसच्या कथित संबंधावर देखील इम्तियाज जलील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. कुरुलकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचं आम्हाला काहीही आश्चर्य वाटत नाही. आपण इतिहास जर तपासून पहिला तर असे जे भ्रष्ट लोक आहेत की ज्यांनी आपल्या देशाला विकण्याचं काम केलं आहे, ते लोक कोण होते हे सगळं समोर येईलच, असं देखील जलील म्हणाले.
‘मोदी-शहांना मी केरला स्टोरीचे तिकीट आणि पॉपकॉर्न स्पॉन्सर करतो’
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवाला इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कारणीभूत ठरवलं आहे. ‘कर्नाटकमधील पराभव हा पंतप्रधान मोदींचे अपयश आहे. त्यामुळे मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माझ्या वतीने केरला स्टोरी या सिनेमाचे दोन तिकीट आणि पॉपकॉर्न स्पॉन्सर केले आहेत. कर्नाटकाच्या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट होती की भाजप देशावर जी हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र देशात लोकशाही जिवंत आहे. आजचा निकाल हा देशातील राजकारणाचा एक टर्निग पॉईंट आहे,’ असं जलील यांनी म्हटलं आहे.