मुंबई : कर्नाटकात भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसने स्पष्ट बहुमताने राज्याची सत्ता काबीज केली आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी १३६ जागांवर काँग्रेसने विजयी पताका फडकावली. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांसह बिगरभाजप पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही या विजयानंतर काँग्रेसचं अभिनंदन करत भाजपवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही ट्वीट करत काँग्रेस कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आणि आगामी काळात महाराष्ट्रातही महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.’कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरू झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे,’ असा हल्लाबोल अजित पवारांनी केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन, असंही अजित पवार म्हणाले. karnatakaच्या निकालाचा अर्थ: मोदींना अलर्ट, राहुल गांधींची दावेदारी आणि २०२४चा निकाल
जितेंद्र आव्हाडांचाही भाजपविरोधात हल्लाबोल
कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. ‘कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही चार राज्य भाजपने खोक्यांचा वापर, तसेच केंद्रीय यत्रणांच्या दहशतीचा वापर करून ताब्यात घेतली होती. मात्र कर्नाटकच्या विजयाने सिद्ध झालं की, लोकांना सुडाचं राजकरण आवडत नाही आणि त्यामुळेच कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत देत भाजपच्या खरेदी-विक्रीच्या धोरणाला मूठमाती दिली. हाच या विजयाचा अन्वयार्थ आहे,’ असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
‘सामान्य जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. परंतु यावर काहीच न बोलता द्वेष आणि फक्त द्वेष पसरवण्याचं काम सत्ताधारी गटाकडून सुरू आहे. पैशाचा, खोक्यांचा वारेमाप वापर करून प्रसंगी केंद्रीय यत्रणांना हाताशी धरून सत्तेचा जो माज सत्ताधारी गटाला चढला होता, तो माज मात्र सामान्य जनतेच्या नजरेत खुपत होता. लोकांनी त्यांचा हा राग मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला,’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.