सातारा (पानवन): संसाराचा गाडा चालवीत असताना पती सखाराम तोरणे यांच्या सहकार्याने सुखाची परवा न करता स्वतःच्या मंगळसूत्राचे मनी विकून आश्रमातील मुलांना जेवण घालणारी थोर माता म्हणजे आजच्या युगातील आधुनिक सावित्रीबाई रमाताई तोरणे! त्यांनी पानवनच्या ओसाड माळरानावर शिक्षणाचा झरा निर्माण केला आहे. या शिक्षणाच्या व्रतापुढे त्यांनी आपल्या स्वप्नांनाही लाथ मारली अन् सारे जीवन या कार्याला वाहिले आहे.मान तालुक्यातील दुष्काळ म्हणजे जीवन बनले आहे. दरवर्षी पाठीवर संसार बांधून शेळ्या, मेंढ्या राखण्यास जाणाऱ्या कुटुंबाची संख्या मोठी आहे. तर उरलेली काही मंडळी उदरनिर्वाहासाठी ऊस तोडीसाठी साखर कारखान्यांचा रस्ता धरतात, तर काही मंडळी माती कामासाठी वसईला जातात. शिक्षण घेणारी लहान मुलेही त्यांच्याबरोबर जातात. या मुलांना कायम शिक्षण मिळावे, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी रमाताई तोरणे आणि सखाराम तोरणे यांनी पानवन येथे आश्रम शाळा सुरू केली.

पानवन येथील माळरानावर उमाकांत बाल विकास संस्थेच्या माध्यमातून संत गजानन महाराज बालकाश्रम सुरू केले आहे. पण त्यासाठी आजपर्यंत शासनाची अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. केवळ इच्छाशक्ती आणि दानशूर लोकांच्या सहकार्यावर हा आश्रम सुरू आहे. या आश्रमशाळेत दरवर्षी ३० ते ३५ मुले मुली शिक्षण घेतात. केवळ पाठ्यपुस्तकच नव्हे तर योगविद्या शेती कामाबरोबरच जीवन जगण्याचे शिक्षण देणारी ही शाळा आहे.

शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांवर मायेचा हात, उच्च शिक्षित अर्चनाताईंकडून आई होऊन ५० मुला-मुलींचा सांभाळ
शासन शासन दरबारी आपली गाऱ्हाणी मांडून काही उपयोग होत नाही, अशी खंत तोरणे दांपत्याने अनेक वेळा व्यक्त केली आहे. केवळ राजकीय व मोठ्या लोकांच्या शिक्षण संस्थांना शासन अनुदान देते, पण गरिबांच्या शिक्षण संस्थांना राजकीय आश्रय मिळतच नाही. परंतु रमाताई तोरणे या शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता पती सखाराम तोरणे (गुरुजी) यांच्या पगारातून व दानशूर व्यक्तींच्या मदतीवर संस्थेतील मुलांचे पालन पोषण केले आहे. रमाताई तोरणे ह्या स्वतः अंगणवाडी सेविका असून स्वतः स्वयंपाक करून स्वतःच्या मुलांपेक्षा अधिक प्रेमाने त्या चिमुकल्यांना सांभाळतात.

रमाताई तोरणे यांनी सुरुवातीला स्वतःच्या मंगळसूत्रातील मनी विकले आणि पती सखाराम तोरणे यांच्या पगारावर कर्ज काढून आश्रमाची इमारत उभारली, तालुक्यातील तसेच इतर तालुक्यातील मेंढपाळ, ऊस कामगार, वसईला माती कामासाठी जाणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वतःच्या जीवनाची होळी करणाऱ्या रमाताई तोरणे यांना आश्रम चालवण्यासाठी कोणी ज्वारी, बाजरी, गहू व भाजीपाला याची मदत करतात. तर काहीजणांनी चादर, पंखे, भांड्यांची मदत केली आहे. अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीवर हा आश्रम गेली अनेक वर्षे चालला आहे. रमाताई व त्यांचे पती सखाराम तोरणे यांच्या कार्याची दखल मान तालुक्यातील काही शासकीय अधिकाऱ्यांनी घेऊन सामाजिक भावनेतून कोणी आर्थिक तर कोणी साहित्य स्वरूपात मदत केली आहे. स्वतः रमाताई तोरणे यांनी आश्रमाच्या सुरुवातीला माळावरचे जळण, लाकडं गोळा करून आणून स्वयंपाक करून एकत्रित मुलांबरोबर जेवण करत होत्या आणि आजही त्या मुलांबरोबरच जेवण करतात.

पतीचं निधन, सासरच्यांनीही साथ सोडली, कष्टाने लेकाला पोलीस अधिकारी केलं; रुक्मिणीताईंची प्रेरणादायी गोष्ट
पानवनसारख्या दुर्गम भागात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या रामाताई तोरणे यांनी आजही स्वतःच्या मुलासारखी आश्रमातील मुलांचा सांभाळ केला आहे. त्या अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती झाल्यापासून शांत व मनमिळावू स्वभावामुळे अनेकांशी आपुलकीचे नाते निर्माण करून प्रामाणिकपणे त्यांनी काम केले आहे. मानसारख्या दुष्काळी भागात आश्रमशाळा चालवण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले आहे. एका अल्पशिक्षित महिलेने अनेक अडचणींवर मात करून प्रतिकूल परिस्थितीत शासनाच्या अनुदानाशिवाय आश्रमशाळा चालवण्याचे कौशल्य दाखवले आहे. भविष्याची गरज लक्षात घेऊन आश्रमशाळेत सुद्धा व्यवस्थितपणा असावा म्हणून रमाताई तोरणे यांनी मुली व मुलांसाठी स्वतंत्र सुसज्ज अशा खोल्या उभारले आहेत. त्याचबरोबर मुले व मुलींसाठी स्वतंत्र बाथरूम उभारले आहेत.

रात्री अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका उभारली आहे. त्याचबरोबर लहान मुलांना पोहण्यासाठी छोटासा स्विमिंग पूलही आश्रमशाळेत आहे. सध्या या आश्रमशाळेत ३५ ते ४० मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना अध्ययन व तसेच संगणक ज्ञान मिळावे यासाठी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून आश्रम शळेला एक संगणक संच भेट दिला आहे. पानवनशिवाय मान तालुक्यात या आश्रमशाळेत मुले-मुली येत असल्यानेही आश्रमशाळा पालकांच्या विश्वासात पात्र ठरली आहे. कोणतेही शासकीय अनुदान व मानधन नाही, तरीही त्या स्वतःच्या मुलासारखे त्यांच्यावर प्रेम करतात. स्वतः रमाताई तोरणे मुलांबरोबर सुयोग समन्वय ठेवतात. त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या माता आहेत.

ही ताई तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर लहानपणापासूनच पानवन येथील आश्रम शाळेची होती. आपल्या पानवान आश्रम शाळेच्या तोरणेताईंनी तिचा संभाळ केला शिकवलं आणि मोठेपणी तिचं लग्न करून दिल आजही ताई लग्नानंतर तिच्या लहान बाळाला आणि नवऱ्याला घेऊन तिच्या हक्काच्या माहेरी तोरणेताईंना आणि आश्रम शाळा भेटण्यासाठी येते.

आई-बापाचं निसर्गप्रेम; लेकीची बीज तुला, चार जिल्ह्यांतून बिया जमवत वृक्षारोपण

रमाबाई तोरणे यांची कहाणी थोडी निराळीच आहे. साताऱ्यात वसतीगृहात राहून त्या नववीपर्यंत शिकल्या. स्वभाविकच तोरणे दांपत्याला परिस्थिती, प्रतिकूलता, संघर्ष हे सारे शब्द अंगवळणी पडलेले होते. लग्नानंतर अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या. त्यातूनच हे दांपत्य मुलांशी जोडले गेले. याच काळात गरीब निराधार अनाथ मुलांची परिस्थिती, होणारी परवड त्यांनी पाहिली, अशा मुलांना काहीतरी करण्याचा निर्धार केला. त्यातूनच मग २००० मध्ये त्यांनी उमाकांत महिला बालविकास शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून पुढे अनाथाश्रम आकारास आले. गजानन महाराजांवर या दाम्पत्याची खूप श्रद्धा, त्यामुळे आश्रमाचे नावही त्यांनी गजानन महाराज आश्रम असेच ठेवले.

तोरणे दाम्पत्याने आजवर शेकडो मुलांचा सांभाळ केला. ममतेने त्या मुलांचे पालनपोषण करत आहेत. त्यातून अनेक मुली शिकल्या, मुले शिकली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. मुलींची लग्नही त्यांनी लावून दिली. आज त्यांचे संसारही सुखीचे चालले आहेत. दीनदुबळ्यांच्या मुलांसाठी अनेक वर्षांपासून विनाअनुदानित आश्रमशाळा चालवीत आहोत. कोरोनाच्या काळातही शाळा बंद होत्या. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षण सुरू केले. मात्र या आश्रमातील निराश्रीत अनाथ मुलांना शिक्षण तर दूरच परंतु जगणेही मुश्किल झाले होते. मात्र या तोरणे दाम्पत्यांनी गोरगरीब मुलांना शिक्षण, संस्कार याचबरोबर कुटुंबाचा जिव्हाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here