मुंबईः ‘पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. तिन्ही पक्षाच्या अंतर्गत वाद आणि बंडाळीमुळे सरकारच्या भवितव्याचे काही खरे नाही. गणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल,’ असा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी केला आहे. आज बांद्रा येथे पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं आहे.

‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवारही नाराज झाले आहेत. तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल अशी शक्यता निर्माण झाल्याने महाविकास आघाडीच्या कंपूत भीती आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याआधी केंद्र सरकार पडेल असं असबंध विधान केले. सामना वृत्तपत्र चालविणे सोपे आहे. मात्र नरेंद्र मोदींशी सामना करणे त्यांना जमणार नाही. केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार मजबूत बहुमत असणारे सरकार आहे. या सरकारला २०२४ पर्यंत धोका नाही. तसेच, २०२४च्या ही निवडणुका मोदी सरकारच जिंकेल.’ असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे.

‘बॉलिवूडमधील निर्माते व दिग्दर्शक कलाकार चांगले असले तरी काही प्रमाणांत कलाकारांवर अन्याय होतो. अमिताभ बच्चन सारख्या कलाकारालाही सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला त्यानंतर ते बिग बी झाले. त्यामुळे सुशांत सिंह या कलाकारावर अन्याय झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अभिनेता सुशांतसिंह रजपूत च्या आत्महत्येची चौकशी सीबीआयद्वारे झाली पाहिजे. अशी मागणी आम्ही केली होती,’ असंही ते म्हणाले.

‘मुंबई पोलीसांचा जगात नावलौकिक आहे. त्या तुलनेत सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास वेगवान झालेला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची केलेली मागणी रास्त आहे. या पूर्वीही अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्याचा अर्थ आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असा होत नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पण एखादे प्रकरण सीबीआय चौकशीसाठी द्यावे ही मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणे असा होत नाही. त्यामुळे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी ही आमची मागणी असल्याचं,’ रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here