अहमदनगर: कोणतीही परवानगी नसताना या नावाने प्रतिकारशक्ती वाढविण्याचे औषध विक्री सुरू केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील कथित डॉक्टर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला आहे. येथील एका औषधाच्या दुकानात हे औषध उपलब्ध असल्याची जाहिरात सोशल मीडियात केल्याने हा गुन्हा संगमनेर येथे दाखल करण्यात येणार आहे.

कोल्हापूरमध्ये रिक्षाचालक ते बोगस डॉक्टर असा प्रवास केलेल्या तोडकर याच्याविरुद्ध यापूर्वीही कोल्हापूरमध्ये कारवाई झाली. संगमनेर येथेही बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल आहे. त्यानंतरही हे प्रकार सुरू आहेच. अलीकडेच तोडकर याने एका औषधाची जाहिरात केल्याचे आढळून आले आहे. यासंबंधी आलेल्या तक्रारीवरून संगमनेरच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी घारगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तोडकर यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.

वाचा:

जीवन संकेत या यू ट्युब चॅनलवर TONO-16 या औषधाची जाहिरात करण्यात आली आहे. डॉ. स्वागत तोडकर याचे हे औषध गुरूदत्त मेडीकल, घारगाव, ता. संगमनेर येथे उपलब्ध असल्याचे त्यात म्हटले आहे. प्रतिकार शक्ती वाढीसाठी हे औषध उपयुक्त असल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे. हा प्रकार बेकायदा आहे. त्यामुळे तोडकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमाचा भंग केल्याचा तसेच औषध व जादुटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करावा, असा आदेश देण्यात आला आहे.

तोडकर याच्याविरुद्ध यापूर्वीही संगमनेर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे. याशिवाय कोल्हापूरमध्येही त्यांच्याविरुद्ध कारवाई झालेली आहे. आरोग्य विभागाने अनेकदा नोटीसाही दिल्या आहेत, तरीही हे प्रकार सुरू आहेत. करोनाच्या काळात लोकांच्या मनातील भीतीचा गैरवापर करण्याचा प्रकार दिसून आल्याने आरोग्य विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे.

वाचा:

कोल्हापूरमध्ये तीन वर्षांपूर्वीच तोडकर याचा भांडाफोड झाला आहे. मूळचा रिक्षाचालक असलेल्या स्वागत तोडकरने कोणतीही वैद्यकीय पदवी न घेता स्वत:च्या नावासमोर डॉक्टर लावण्यास सुरुवात केली. इंटरनेटवरून निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक औषधांचा वापर करून आपली दुकानदारी सुरू केली. त्याने ‘हसत खेळत आरोग्यविषयक घरगुती उपचार’ या विषयावरील आठ हजार व्याख्याने राज्यभर दिली आहेत. व्याख्यानांचे व्हिडिओ यू ट्यूबवर टाकून आपल्या व्यवसायाचा ग्राफ वाढवला. तोडकर स्वत:च्या नावापुढे एम.डी, एनएलपी, एन. डी, मनोविकार तज्ज्ञ, समाजसेवक अशी बिरुदावली लावतो. कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही घातक उपचार करणाऱ्या स्वागत तोडकर व कोमल पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने मार्च २०१७ मध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिस ठाण्यातून सुटका झाल्यावर तोडकरने न्यू महाद्वार रोडवर संजीवनी निसर्ग आधार केंद्र सुरू केले. यू ट्यूब आणि सोशल मिडियावर त्याची भाषणे ऐकून राज्यभरातील रुग्ण कोल्हापुरात जतात. पुणे, संगमनेर येथे त्याने केंद्रे सुरू केली. तेथेही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. संगमनेर येथे गुन्हा नोंद होऊनही त्याच्या निसर्ग उपचार केंद्रात गर्दी पहायला मिळते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here