यवतमाळ : मागील वर्षी शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केल्यानंतर कापसाचे दर १४ हजारांच्या पुढे गेले. हेच यंदाही घडणार ही अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांचा अंदाज चुकला. भाव आठ-साडेआठ हजारांपुढे गेले नाहीत. त्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला. शुक्रवारी घरात लागलेल्या छोट्याशा आगीला याच कापसाने बळ दिले. आग भडकली आणि वर्डिलोपार्जित वाडा क्षणार्धात राख झाला. अंगावरील कपड्यांपलीकडे हाताशी काहीही उरले नसल्याने शेतातील टिनच्या शेडमध्ये शेतकऱ्याला आसरा घ्यावा लागला आहे. पुसद तालुक्यातील पार्डी येथील अशोक झरकर यांची ही व्यथा.
खरीप हंगामात रक्ताचे पाणी करून कापूस पिकवला. बाजारात चढा असलेला दर शेतातून कापूस आणेपर्यंत घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार होत असल्याने भाव नक्की वाढणार ही चर्चा गावातील पारावर रोज व्हायची. अशोकलाही दरवाढीचा विश्वास वाटू लागला. शेतातून आणलेला सुमारे १५ क्विंटल कापूस त्यांनी आपल्या वडिलोपार्जित वाड्यात ठेवला. खरिपाच्या सोयीसाठी हा कापूस मदतीला येणार ही आशाही होती.

दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी विवाह सोहळ्यासाठी ते हिमायतनगरला गेले. त्यांची पत्नी दोन मुलांसह शेतावर गेल्या. दुपारच्या सुमारास घरात कुणीही नव्हते. याच सुमारास घरात आग लागली. साठवून ठेवलेल्या कापसानेही पेट घेतल्याने ती आग क्षणात भडकली. गावकऱ्यांनी तातडीने पुसदच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अशोक हे तातडीने गावी परतले. शेतातून पत्नी आणि मुलेही धावून आली. तोवर वाड्यासह सारेच राख झाले होते. आता केवळ अंगावरील कपडे तेवढेच उरले होते.