म. टा. प्रतिनिधी, : बलात्कार, विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला जामीन मिळावा असा अहवाल पोलिसांनी द्यावा, यासाठी आरोपीच्या पत्नीने पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अंगावर डिझेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न तिने केला. येरवडा पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.

येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि तिला नोटीस बजावली आहे. पोलीस शिपाई प्रमिला पवार यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून नगर रोड येथे राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार, विनयभंग प्रकरणी २०१९ मध्ये येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या जामिनाबाबत न्यायालयात सुनावणीची तारीख आहे. या आरोपीला जामीन देण्यात यावा असा अहवाल पोलिसांनी द्यावा, यासाठी आरोपीची पत्नी बुधवारी पोलीस ठाण्यात आली होती. तिने सोबत लपवून आणलेल्या बाटलीत डिझेल होते. सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास तिने बाटलीतील डिझेल अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडताच पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी ड्युटीवर हजर असलेल्या महिला कर्मचाऱ्याने या महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. या महिलेला सीआरपीसी ४१ (१ ) (अ) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक एस. बी. बनसोडे हे करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here