दरम्यान, मोहन रामचा पुत्र संतोष राम याने काकू हेमंती, वहिनी रमा आणि काकाची मुलगी माया यांचा शेजारच्या घरात झोपलेल्या अवस्थेत धारदार शस्त्राने वार करून खून केला. रक्ताने माखलेलं हत्यार घेऊन तो घराकडे निघाला तेव्हा ते पाहून त्याची मुलगी जोरात किंचाळली. तिचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तेथे पोहोचले, तेव्हा आरोपी संतोषने तेथून पळ काढला.
त्यानंतर गावकऱ्यांनी शेर रामच्या घरात डोकावून पाहिल्यावर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तीन मृतदेह दिसले आणि सर्वांनाच धक्का बसला. याची माहिती ग्रामस्थांनी तत्काळ एसडीएमना दिली. त्यावर एसडीएम अनिल कुमार शुक्ला, सीओ महेशचंद्र जोशी, तहसीलदार अबरार अहमद यांच्यासह पोलीस आणि महसूल पथक घटनास्थळी पोहोचले. याच घटनेनंतर संतोषच्या मुलांनी त्यांच्या घराची खोली उघडली असता त्यांना संतोषची पत्नी चंद्रकला (३५) यांचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला.
घटनेच्या वेळी मृत रमादेवीचे पती प्रकाश राम हे गंगोलीहाट मिरवणुकीत गेले होते. प्रकाश राम चोलिया डान्स टीमचे सदस्य आहेत. त्यांना ३ वर्षे आणि १८ महिने वयाची दोन मुलं आहेत. हेमंती देवी या प्रकाश राम यांच्या सावत्र आई आहेत. हेमंती देवीपासून अपत्य न झाल्यामुळे प्रकाश राम यांच्या वडिलांनी बसंतीदेवीशी पुनर्विवाह केला होता. संतोष रामने तिच्या कुटुंबातील तीन महिलांची हत्या केली तेव्हा बसंती देवी या नातवासोबत गोठ्यात गाईचे दूध काढण्यासाठी गेल्या होत्या, त्यामुळे त्या दोघांचा जीव वाचला.
बुरुसुम येथील या हत्याकांडामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारेकरी गेल्या १० दिवसांपासून कुटुंबाचा पाठलाग करत होता आणि त्यांना सतत धमकावत होता. मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करावी, असे लोकांचे म्हणणे आहे. एकाच वेळी ४ जणांना मारणारा तो कधीही मोठी घटना घडवू शकतो. प्रकाश यांची दोन मुले, आई आणि गावातील लोकही आता धोक्यात आहेत.