भगवान केंद्रे (वय २३, रा. ता. कळंब, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार फरार आहे. गौरव सुरेश उदासी (वय ३५, रा. अमरावती) असे हत्या झालेल्या संगणक अभियंता तरुणाचे नाव आहे. तो एका आयटी कंपनीत नोकरीस होता. खराडी भागातील एका सोसायटीत तो मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गौरव जेवायला जातो, असे मित्रांना सांगून बाहेर पडला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही.
शनिवारी दुपारी लोहगाव-भावडी रस्त्यावरील मल्हार डोंगराच्या पायथ्याशी रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे गौरवची दुचाकी सापडली होती. दुचाकी क्रमांकावरून पोलिसांनी शोध घेऊन गौरवची ओळख पटविली होती. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात गौरवचा खून आरोपी भगवान केंद्रे याने केल्याची माहिती मिळाली.
कॅब बुकिंगुळे झालेली ओळख
आरोपी भगवान पुण्यात एका ॲप आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीसाठी कॅब सेवा देत होता. गौरवने यापूर्वी ॲपवरून दोन वेळा प्रवासासाठी गाडीचे बुकिंग केले होते. त्यावेळी भगवानचीच कार वापरण्यात आली होती. त्यामुळे गौरव आणि भगवान यांची ओळख झाली होती. तसेच, त्यांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांकही घेतले होते.
वादावादीनंतर केले मानेवर वार
गौरव भगवानला कॅबचे तीन हजार रुपये भाडे देणे लागत होता. गौरवने वेळेवर पैसे दिले नाहीत. त्यामुळे भगवान त्याच्यावर चिडला होता. भगवानने शुक्रवारी रात्री गौरवला बोलावून घेतले. भगवान, त्याचा साथीदार आणि गौरव कारमधून मल्हार डोंगराच्या पायथ्याशी गेले. तेथे वादावादीनंतर त्याची हत्या करण्यात आली.