बगदाद: इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाईतळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेचे ८० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणच्या सरकारी वृत्त वाहिनीने केला आहे. ‘अमेरिकेचे ८० दहशतवादी मारले’ असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे. या वृत्ताला अमेरिकेकडून मात्र कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

इराणचा दावा खोडणारी वृत्तेही पुढे येत आहेत. इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचा एकही सैनिक ठार झालेला नाही. काही इराकी सैनिक ठार झाले आहेत, असा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, अमेरिकेने बगदाद येथील विमानतळाबाहेर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्‌स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी इराणने इराकमधील अमेरिकी लष्कराच्या तळावर मोठा हल्ला चढवला. किमान १२ क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकी लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागण्यात आली. पेंटागॉनने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिका विरुद्ध इराण युद्धाचे ढग आणखीच गडद झाले आहेत.

…तर आणखी मोठा प्रतिहल्ला करू!

इराण सरकारचे प्रवक्ते अली राबेई यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दांत बजावले आहे. आम्हाला युद्ध नको आहे मात्र आमच्यावर पुन्हा कुणी हल्ला केल्यास यापेक्षा मोठा प्रतिहल्ला करण्यात येईल, असा इशारा राबेई यांनी दिला. त्यांनी अमेरिकेविरुद्धच्या कारवाईसाठी इस्लामिक रीव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचेही खास अभिनंदन केले.

ट्रम्प यांचे मोठ्या हल्ल्याचे संकेत

इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यावर प्रत्युत्तर दिलं. ‘ऑल इज वेल. इराणने अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. आतापर्यंत तरी सगळं काही ठिक आहे. आम्हीच सर्वात बलशाली आहोत, हे मला पुन्हा एकदा नमूद करायचे आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी सर्वात सक्षम फौज आमच्याकडे आहे. या हल्ल्यावर आता उद्या सकाळीच मी माझे निवेदन जारी करणार आहे’ असे ट्विट करत ट्रम्प यांनी इराणवर मोठा हल्ला करण्याचे संकेतच दिले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here